वडील, बहिणींमुळे घडलो!

By Admin | Updated: January 9, 2017 02:41 IST2017-01-09T02:41:03+5:302017-01-09T02:41:03+5:30

माझ्या संगीतविषयक वाटचालीत, वडील आणि बहिणींचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्यामुळेच मला मान-सन्मान मिळाले. यश मिळाले, असे मत भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केले.

Father and sisters! | वडील, बहिणींमुळे घडलो!

वडील, बहिणींमुळे घडलो!

पिंपरी : माझ्या संगीतविषयक वाटचालीत, वडील आणि बहिणींचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्यामुळेच मला मान-सन्मान मिळाले. यश मिळाले, असे मत भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात नादब्रह्म परिवाराच्या वतीने आयोजित मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सवात ते बोलत होते. या वेळी करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते नादस्वरब्रह्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी शारदापीठाचे वसंतराव गाडगीळ, वेदमूर्ती दी. मा. फडके, संस्थेचे प्रमुख डॉ. रवींद्र घांगुर्डे, डॉ. वंदना घांगुर्डे, अरुण चितळे आदी उपस्थित होते.
मंगेशकर म्हणाले, ‘‘वयाच्या आठव्या वर्षापासून रंगमंचावर काम करीत आहे. ज्या चांगल्या संगीतरचना माझ्या हातून झाल्या आहेत, त्या वडिलांच्या संस्कारामुळेच. ही त्यांची कृपा आहे. ज्या ज्या ठिकाणी अडचण आली, तिथे नकळत वडिलांनी हात दिला. वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी प्रतिष्ठानाच्या वतीने दर वर्षी मान्यवरांचा सन्मान करतो. मला हा पुरस्कार माझे वडील आणि बहिणीमुळे मिळाला. माझ्या वाट्याला आलेल्या मानसन्मानामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. अनेकांच्या ठिकाणी चांगले गुण असतात; पण त्यांना योग्य तो
मान मिळतोच असे नाही; पण मला हे भाग्य केवळ वडील व आईसमान असलेली बहीण लता मंगेशकर यांच्यामुळे शक्य झाले.’’
डॉ घांगुर्डे प्रास्ताविकात म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या २२ वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सव सुरू
आहे. संगीत चळवळीत नादब्रह्म परिवार योगदान देत आहे. संगीत चळवळ वाढीसाठीचा महोत्सव हा प्रयत्न आहे.’’ प्रसिद्ध अभिनेते प्रमोद पवार आणि तृप्ती भागवत यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Father and sisters!