गावकारभाऱ्यांचे नशीब आज उघडणार
By Admin | Updated: August 6, 2015 03:48 IST2015-08-06T03:48:46+5:302015-08-06T03:48:46+5:30
जिल्ह्यातील सुमारे ६१९ ग्रामपंचायतींचे कारभारी कोण, हे उद्या ( ६ आॅगस्ट) सायंकाळी ५ पर्यंत स्पष्ट होईल. गावकारभाऱ्यांचे नशीब आज उघडणार

गावकारभाऱ्यांचे नशीब आज उघडणार
पुणे : जिल्ह्यातील सुमारे ६१९ ग्रामपंचायतींचे कारभारी कोण, हे उद्या ( ६ आॅगस्ट) सायंकाळी ५ पर्यंत स्पष्ट होईल. गावकारभाऱ्यांचे नशीब आज उघडणार असल्याने उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात पडणार याबाबत गावागावांत मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे. यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यात आॅगस्ट ते आॅक्टोबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ७०३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यांपैकी ८३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. यामुळे ४ आॅगस्ट रोजी ६२० ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले.
गावकीच्या या निवडणुका गावकारभाऱ्यांनी चांगल्याच प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. एकाच पक्षाचे अनेक गट एकमेका विरोधात लढल्याने मतदारांनी कोणाच्या बाजूने कल दिला याकडे लक्ष लागले आहे. चुरशीने लढवलेल्या या निवडणुका शांततेत पार पडल्या. मतदानालाही चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, अनेक गावांमध्ये ‘क्रॉस वोटींग’ झाले आहे.
बारामती : बारामतीत मतमोजणीदेखील शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. एमआयडीसीतील रिक्रिएशन हॉल येथे बंदोबस्तासाठी ८० पोलीस कर्मचारी, ८ एपीआय आणि पीएसआय व दोन पोलीस निरीक्षक असणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या गावांमध्ये निवडणुका झाल्या आहेत, त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच कार्यकर्त्यांनी आचारसंहिता पाळावी, मिरवणुका काढू नयेत, असे आवाहनही तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांनी केले आहे.
‘क्रॉस वोटिंग’ मोठ्या प्रमाणात
अनेक गावांमध्ये ‘पॅनेल टू पॅनेल’ मतदान न होता, ‘क्रॉस वोटिंग’मोठ्या प्रमाणात झाले आहे. कोणी भावकी, कोणी जात तर कोणी आपला मित्र पाहून मतदान केले. त्यामुळे उमेदवारांनाही मतदानाचा नेमका अंदाज आलेला नाही. याबबतच्या चर्चा मोठ्या प्रमाणात गावागावांत मंगळवारी, बुधवारी रंगल्या होत्या. आता केवळ आपले ‘नशीब’च असाही सूर काही उमेदवारांमधून उमटत होता.
मतमोजणीसाठी कडक बंदोबस्त
मावळ गोळीबार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गुरुवारी होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.
मावळ तालुक्यातील खडकाळे (कामशेत) येथे मनसेच्या तालुकाध्यक्षावर गोळीबार होऊन यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर संतप्त जमावाने येथील मतदान केंद्रांवर हल्ला करून यंत्रांची तोडफोड केली. यामुळे दुपारनंतर येथील मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली. येथे फेरमतदान घ्यावे, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी राज्य निवडणूक आयोगाला पाठविला होता. खडकाळे गावात एकूण १० मतदान केंद्रे होती. त्यांपैकी ७ ठिकाणी फेरमतदान घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या १९ आॅगस्ट रोजी या ७ केंद्रांसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत फेरमतदान घेण्यात येणार असून, १० मतदान केंद्रांची मतमोजणी २० आॅगस्ट रोजी तालुक्याच्या ठिकाणी करण्यात येणार असल्याचे राव यांनी सांगितले.
जिल्ह्यात मतदान
तालुक्याचे नाव टक्केवारी
आंबेगाव७८.१९ %
खेड८६.२८ %
जुन्नर७८.६४ %
मावळ८६.०३ %
मुळशी८१.६० %
शिरूर८५.८६ %
भोर८५.८६ %
वेल्हा८६.६६ %
दौंड८२.२७ %
बारामती८७.५८ %
इंदापूर८३.५० %
पुरंदर८४.७९ %
हवेली८०.८१ %
पिंपरी-चिंचवड७८.७७ %
(प्रतिनिधी)