फरासखाना स्फोटाचा तपास अधांतरीच
By Admin | Updated: August 11, 2014 03:48 IST2014-08-11T03:48:35+5:302014-08-11T03:48:35+5:30
फरासखाना व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारात दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवल्याच्या घटनेला एक महिना पूर्ण झाल्यानंतरही दहशतवाद विरोधी पथकासह तपास यंत्रणांच्या हातामध्ये ठोस काहीही लागलेले नाही

फरासखाना स्फोटाचा तपास अधांतरीच
पुणे : फरासखाना व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारात दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवल्याच्या घटनेला एक महिना पूर्ण झाल्यानंतरही दहशतवाद विरोधी पथकासह तपास यंत्रणांच्या हातामध्ये ठोस काहीही लागलेले नाही. त्यामुळे तपास यंत्रणांच्या आवाक्याबाहेर असल्याचे चित्र आहे. फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्ब पेरलेली दुचाकी लावणाऱ्या दहशतवाद्यांची अगदी स्पष्ट छायाचित्रे एटीएसच्या हाती लागली आहेत. या दोघा जणांचा युद्धपातळीवर तपास सुरू असून दहा जणांकडे आतापर्यंत कसून चौकशी करण्यात आल्याचे एटीएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला लागूनच असलेल्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात दहशतवाद्यांनी १० जुलै रोजी दुपारी २.०५ वाजता बॉम्बस्फोट घडवून आणला होता. सातारा शहर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी दादासाहेब रासगे यांची मोटारसायकल क्रमांक (एमएच ११ एनयू ७१७४) सातारा न्यायालयाच्या आवारामधून चोरण्यात आली होती.
या मोटारसायकलला डिकी बसवून, त्यात बॉम्ब पेरण्यात आला होता. पोलीस ठाण्याच्या समोरच असलेल्या श्री वडापाव सेंटरच्या मालकीण व कामगारांसह एकूण पाच जण गंभीर जखमी झाले होते. या स्फोटाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे देण्यात आला होता. एटीएस व पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यानंतर शहरातील ठिकठिकाणी सीसीटीव्ही फुटेजची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती. यातील बाजीराव रस्ता, सिंहगड रस्ता, भाऊ महाराज बोळ, तुळशीबाग परिसर, स्वारगेट बस आगार आदी भागांतील सीसीटीव्हीत दहशतवाद्यांची छबी टिपली गेली आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी बॉम्ब ठेवणाऱ्या दोघा जणांची छायाचित्रे तयार करून घेतली आहेत. ही छायाचित्रे अगदी स्पष्ट असल्यामुळे त्याआधारे दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू आहे.
यासोबत फरासखान्यासमोरील कामगार भवनातील सीसीटीव्हीमध्ये मोटारसायकल पार्किंगमध्ये लावतानाच,े तसेच बॉम्बस्फोट होतानाचे चित्रीकरण आलेले आहे. सकाळी साधारणपणे सातच्या सुमारास दहशतवाद्यांनी बॉम्ब पेरलेली मोटारसायकल लावली होती. बॉम्बची दिशा जमिनीच्या दिशेने असल्यामुळे, तसेच आजूबाजूला मोटारसायकली लावलेल्या असल्यामुळे बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यातील बॉल बेअरिंग, छर्रे अधिक प्रमाणात बाहेर उडू शकले नाहीत. (प्रतिनिधी)