नारायणगावमधील गाळ्यांच्या मोजणीचा फार्सच!
By Admin | Updated: December 8, 2015 00:09 IST2015-12-08T00:09:09+5:302015-12-08T00:09:09+5:30
नारायणगाव-जुन्नर रोडवरील मोजणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने तसेच पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने

नारायणगावमधील गाळ्यांच्या मोजणीचा फार्सच!
नारायणगाव : नारायणगाव-जुन्नर रोडवरील मोजणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने तसेच पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने तसेच नारायणगाव ग्रामपंचायतीने जागेवर आपला हक्क सांगितल्याने सोमवारी होणारी मोजणी स्थगित झाली़
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वत: उपस्थित न राहता शिपायांना पाठविल्याने उलटसुलट चर्चा सुरू होती.
सकाळी १० वाजता भूमिअभिलेख कार्यालयाचे कर्मचारी व अधिकारी नारायणगाव-जुन्नर रोडच्या मोजणीसाठी आले असता ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष पाटे यांनी हरकत घेतली. सदरची पत्राशेडची जागा ही ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या नावे असून, मिळकत नं़ १०० वॉर्ड नं़ ३ पूर्व ते पुणे-नाशिक रोडपर्यंत १२० फूट पूर्व-पश्चिम लांबीची बखळ जागा ग्रामपंचायत नारायणगावचे नावे आहे़ सदरच्या गाळेधारकांनी खेड कोर्टात दि़ ७/११/२०१५ रोजी दावा दाखल केला असून, निरंतर मनाई ताकिदीची मागणी केलेली आहे़ या दाव्यात प्रतिवादी नं़ १ म्हणून सरपंच व ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत नारायणगाव व प्रतिवादी नं़ २ म्हणून उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर यांना पार्टी केलेले आहे़ सदर मिळकत व त्यातील गाळे न्यायप्रविष्ठ असल्याने मोजणी करणे योग्य राहणार नाही़, असा खुलासा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला़ तथापि दुपारनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता चौधरी हे नारायणगाव पोलीस ठाण्यात गेले व त्यांनी पोलीस बंदोबस्त मागितला़ परंतु सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात यांनी तत्काळ बंदोबस्त देण्यास असमर्थता व्यक्त केली़ पोलीस बंदोबस्तासाठी दोन दिवस अगोदर अर्ज करणे अपेक्षित होते. जेवढा बंदोबस्त हवा तेवढा नजराणा भरणे गरजेचे होते़ सार्वजनिक बांधकाम विभागाचे दि़ ५ डिसेंबर रोजीचे पत्र आहे. आपण ते आज देत आहात़ तत्काळ बंदोबस्त देणे शक्य नाही़ पोलीस ठाण्यातील कर्मचारी/अधिकारी आळंदी येथील बंदोबस्ताला गेलेले आहेत़ त्यामुळे आजच्या आज कर्मचारी/अधिकारी देता येणार नाहीत़ त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी मोजणीच्या ठिकाणी फिरकला नाही़ मोजणीसंदर्भात कार्यकारी अभियंता पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, मोजणी आजच होईल. संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश आलेले आहेत़ त्यामुळे मोजणी होणार असे स्पष्ट केले. मात्र ती झालीच नाही. (वार्ताहर)