कालव्यात शेतकरी गेला वाहून
By Admin | Updated: December 12, 2015 00:46 IST2015-12-12T00:46:59+5:302015-12-12T00:46:59+5:30
नेरे येथील धोमबलकवडी धरणाच्या कालव्याच्या पाण्यात म्हैस वाचविण्यास गेलेला शेतकरी वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता; मात्र ते सापडले नाहीत.

कालव्यात शेतकरी गेला वाहून
भोर : नेरे येथील धोमबलकवडी धरणाच्या कालव्याच्या पाण्यात म्हैस वाचविण्यास गेलेला शेतकरी वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता; मात्र ते सापडले नाहीत.
रामचंद्र हरिभाऊ शिंदे (वय ६५, रा. नेरे) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता घडली. आत्तापर्यंत विविध घटनांत या कालव्यात वाहून जाऊन चार जण मरण पावले आहेत, तर एकाला वाचविण्यात यश आले आहे.
याबाबतची महिती अशी की, भोर-मांढरदेवी रोडवरील नेरे गावातून धोमबलकवडी धरणाचा कालवा जातो. आज सकाळी साडेदहा वाजता गावातील रामचंद्र शिंदे आपली जनावरे चारायला घेऊन कालव्याच्या पलीकडे जात होते. या वेळी प्राथमिक शाळेजवळच्या कालव्यात एक म्हैस पाण्यात उतरली. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने म्हैस पाण्यात वाहून जाईल, या भीतीने ते पाण्यात उतरले. म्हशीला वाचविण्याच्या प्रयत्नात पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने शिंदे पाण्यात वाहून गेले. म्हैस पोहुण कालव्याच्या पलीकडच्या टोकाला निघाली. ही घटना नेरे ग्रामस्थांनी धोमबलकवडी धरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना सांगून कालव्याचे पाणी बंद करण्यास सांगितले; मात्र पाणी बंद न केल्याने पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने शोध मोहिमेत अडचण येत होती. यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. (वार्ताहर)