चौपदरीकरणाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2015 03:19 IST2015-06-23T03:19:30+5:302015-06-23T03:19:30+5:30

खेड ते सिन्नरदरम्यान होणाऱ्या चौपदरीकरणाच्या कामातील आळेफाटा परिसरातील प्रस्तावित बाह्यवळणात जाणाऱ्या जमीनमोजणीला आज शेतकऱ्यांनी

Farmers' strong opposition to four-dimensionalization | चौपदरीकरणाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

चौपदरीकरणाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

आळेफाटा : खेड ते सिन्नरदरम्यान होणाऱ्या चौपदरीकरणाच्या कामातील आळेफाटा परिसरातील प्रस्तावित बाह्यवळणात जाणाऱ्या जमीनमोजणीला आज शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा विरोध केला. बाह्यवळण रद्द करा, अशी भूमिका शेवटपर्यंत शेतकऱ्यांनी घेतल्याने अखेर प्रशासनाने या मोजणीला स्थगिती दिली.
पुणे-नाशिकदरम्यान होणाऱ्या या दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सध्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगाने सुरू आहे. आळेफाटा परिसरातून या कामातील बाह्यवळण प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र, या परिसरातील आळेफाटा, वडगाव आनंद, आळे येथील ८५ शेतकऱ्यांची जवळपास ९३ एकर सुपीक बागायती शेती संपादित करण्यात येणार आहे.
या कामातील शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून विरोध केला. मार्च २०१३ या महिन्यात या बाह्यवळणाच्या जमीनमोजणीला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवून या मोजणीचे कामच बंद केले होते.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग यांच्या वतीने आज पुन्हा आळेफाटा परिसरातील बाह्यवळण मोजणीला भूमिअभिलेखचे कर्मचारी आले. मात्र, त्यांना पहिल्यापासून विरोध झाला. तहसीलदार प्रल्हाद हिरामणी, राष्ट्रीय महामार्गचे डी. एस. झोडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ‘विघ्नहर’चे माजी उपाध्यक्ष भीमाजी गडगे, सामाजिक कार्यकर्ते अनंत चौगुले, माजी सरपंच प्रदीप देवकर, संतोष चौगुले, अशोक गडगे, गणेश गडगे, गणपत वाळुंज, चंद्रशेखर गडगे, उत्तर पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुहास कहडणे, महेश शिंदे यांनी कोणत्याही परिस्थितीत आपण बाह्यवळण होऊन देणार नाही, अशी भूमिका घेतली. तहसीलदार प्रल्हाद हिरामणी यांनी या वेळी शासनाची भूमिका स्पष्ट केली. मात्र, शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता तहसीलदार हिरामणी यांनी जिल्हाधिकारी व आमदार शरद सोनवणे यांच्याशी संपर्क साधला व शेतकऱ्यांच्या भावना कळविल्या. याबाबत त्यांच्याशी चर्चा करून यातून मार्ग काढायचा, असा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले व या मोजणीला स्थगिती देण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Farmers' strong opposition to four-dimensionalization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.