शेतक-यांनी कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा
By Admin | Updated: January 7, 2015 22:56 IST2015-01-07T22:56:08+5:302015-01-07T22:56:08+5:30
शेती व ग्रामीण भागातील बदलत्या तंत्राची महत्त्वपूर्ण माहिती मिळणार असल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने कृषी प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा,

शेतक-यांनी कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा
खळद : शेती व ग्रामीण भागातील बदलत्या तंत्राची महत्त्वपूर्ण माहिती मिळणार असल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने कृषी प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांनी केले आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन शिवतारे यांच्या हस्ते सासवड येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषिविकासाच्या नवनवीन पद्धतीचा उपयोग पुरंदर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना होण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये कृषी जैविक तंत्रज्ञान, फलोत्पादन तंत्रज्ञान, कुक्कुटपालन, सामाजिक वनीकरण, वाहतूक व कृषी उत्पादन हाताळणी, दळणवळण तंत्रज्ञान, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, साठवण गोडाऊन, अपारंपरिक ऊर्जा, विपणन तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय बाजार, कृषी अर्थसाहाय्य, कृषी संशोधन, ग्रामीण विकास, सहकार चळवळ, फळबाग लागवड, सेंद्रिय शेती, दुग्धोत्पादन व पशुसंवर्धन, याचबरोबर शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.
प्रदर्शनाचे स्वागताध्यक्ष म्हणून दिलीप यादव, निमंत्रक म्हणून भूषण ताकवले यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी आबा भोंगळे, अतुल म्हस्के, उमेश गायकवाड, रघुनाथ बोरकर, विवेक दाते, दत्तात्रय शिवतारे, सचिन भोंगळे, कुणाल जगताप आदी उपस्थित होते. (वार्ताहर)