बंदिस्त जलवाहिनीवरून मावळातील शेतकरी नाराज
By Admin | Updated: March 16, 2017 01:48 IST2017-03-16T01:48:19+5:302017-03-16T01:48:19+5:30
मावळातील बंद जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांशी चर्चा करून लवकरच मार्गी लावणार असल्याचे पिंपरी-चिंचवडचे नूतन महापौर नितीन काळजे यांनी पहिल्याच दिवशी सांगितले

बंदिस्त जलवाहिनीवरून मावळातील शेतकरी नाराज
उर्से : मावळातील बंद जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांशी चर्चा करून लवकरच मार्गी लावणार असल्याचे पिंपरी-चिंचवडचे नूतन महापौर नितीन काळजे यांनी पहिल्याच दिवशी सांगितले. त्यावर मावळातील शेतकऱ्यांनी नाराजी प्रकट केली आहे.
मावळ तालुक्यातील बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचे काम सात वर्षांपासून बंद आहे. पिंपरी-चिंचवडकर व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्नावर शेतकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढणार असल्याचे महापौर काळजे म्हणाले होते. त्यामुळे आता हा प्रकल्प खरोखर मार्गी लागणार कीपहिल्यासारखा प्रखर विरोध होणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. मावळात बंदिस्त जलवाहिनीस भाजपा, शिवसेना व भारतीय किसान संघ आदींनी पहिल्यापासूनच विरोध केला आहे. मात्र, आता महापालिकेत भाजपाची सत्ता असताना हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या महापौरांच्या विधानाबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खातरजमा, अभ्यास व शेतकऱ्यांचा विश्वास संपादन न करता आखलेली ही योजना विरोध आणि नंतर झालेल्या आंदोलनामुळे बंद पडली.
शेतकऱ्यांना विश्वासात न घेता व कुठलेही पत्र न देता जमिनीची केलेली मोजणी, जबरदस्ती, पोलीस बळाचा वापर अशा अनेक गोष्टींचा परिणाम दिसून आला. त्यातच ९ आॅगस्ट रोजी झालेल्या आंदोलनातील गोळीबारात तीन शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. यानंतर या प्रकल्पाला न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. गेल्या ११ वर्षात फक्त पिंपरी-चिंचवड हद्दीतीलच बंदिस्त जलवाहिनीचे काम करण्यात आले. उर्वरित काम गहुंजेपासून बंद पाडण्यात आले. अतिशय वेगाने ३८ कोटी रुपयांचे काम केले.(वार्ताहर)