दिल्लीतील शेतकरी आंदोलन मागे घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:01 IST2021-02-05T05:01:35+5:302021-02-05T05:01:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात प्रजासत्ताकदिनी झालेला हिंसाचार देशाच्या स्वाभिमानाला धक्का लावणारा आहे. किमान आता तरी ...

दिल्लीतील शेतकरी आंदोलन मागे घ्यावे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात प्रजासत्ताकदिनी झालेला हिंसाचार देशाच्या स्वाभिमानाला धक्का लावणारा आहे. किमान आता तरी शेतकरी संघटनांना आंदोलन मागे घेत सरकारबरोबर चर्चा करावी, असे आवाहन भारतीय किसान संघाचे राज्य अध्यक्ष बळीराम सोळंके यांनी केले.
दिल्लीत शेतकऱ्यांना आंदोलनाला प्रवृत्त करून काही राजकीय शक्ती लोकसभेच्या आगामी निवडणुकांसाठी पार्श्वभूमी तयार करत आहेत. अशा शक्तींनी लाल किल्ल्यावरील तिरंग्याचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला. यातून देशाच्या स्वाभिमानालाच धक्का लागला आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी या सर्व प्रकाराचा तपास करावा आणि दोषींना माफी देऊ नये अशी मागणी किसान संघ करणार असल्याचे सोळंके यांनी सांगितले.
ते म्हणाले की, किसान संघही सुरुवातीपासून शेतीविधेयकातील किमान चार मुद्द्यांच्या विरोधात आहे, मात्र आपण आपल्याच देशातील नागरिकांनी निवडून दिलेल्या आपल्याच सरकारला विरोध करतो आहोत, याचे भान किसान संघाने सुटू दिले नाही. दिल्लीतील शेतकरी संघटनांची कृती परक्या सरकारबरोबर भांडत असल्याप्रमाणे आहे. इतक्या बैठका होऊनही तोडगा निघत नसेल तर त्यात या संघटनांचेच चुकते आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. त्यामुळे सरकारनेही ताठर भूमिका घेतली असेल तर ते गैर नाही.
किसान संघाचा विरोध आहे तर मग संघ काय करत आहे असे विचारले असता सोळंके म्हणाले की, आम्ही आमचे म्हणणे सरकारपर्यंत सनदशीर मार्गाने पोहोचवले आहे. शेतकऱ्यांचे लेखी प्रस्ताव केंद्र सरकारला दिले. सरकारची भूमिका चर्चेची आहे. आमची वाट पाहण्याची तयारी आहे. आंदोलन करण्यासारखी ही गोष्ट नाही, असे सोळंके यांनी सांगितले.