कवडीमोल भाव....शेतकऱ्याने दीड एकर कांद्याच्या शेतात सोडल्या शेळ्या मेंढ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 04:55 PM2018-12-27T16:55:55+5:302018-12-27T17:05:16+5:30
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांदा पिकाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
दावडी : दोन महिन्यांपूर्वी हजारो रुपये खर्च करुन कांदा पिकाची लागवड केली होती. या पिकातून चार दोन पैसे मिळतील आणि त्यातून कुटुंबाचा गाडा हाकण्यास मदत होईल ही अपेक्षा होती. पण सध्या कांद्याला जो भाव मिळतोय त्याने कांद्याचा साधा खर्च देखील वसूल होत नाही..त्यामुळेच खरपुडी (ता खेड ) येथील विजय काशिद या शेतकऱ्यांने दीड एकर कांदा पिकात शेळ्या मेंढ्या चरायला सोडल्या.
मागील वर्षी कांदा पिकाला चांगला भाव मिळाला म्हणून यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची लागवड केली. मात्र, भावात ५०० ते ६०० रुपयांच्या पुढे वाढ होत नसल्याने व हा भाव परवडणारा नसल्याने शेतकरी चिंतातूर आहे. रोज नवा कांदा बाजारात येऊ लागल्यामुळे पुढे कांद्याला बाजार भाव मिळेल की नाही, उत्पादन खर्चही सुटणार नाही त्यामुळे अजुन कशात अजून कशाला तोट्यात जायचं अन् उद्या भाव वाढले तर..असे प्रश्न शेतकऱ्यांची द्विधावस्था करत आहेत.
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांदा पिकाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे पीक शेतात तसेच सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. खरपुडी परिसरातील येथील विजय काशिद या शेतकऱ्यांने आपल्या दीड एकर उभ्या कांद्याच्या पिकात शेळया मेंढ्या चरावयाला सोडून पीक नष्ट केले. बहुतेक शेतकरी कांदा पिकाला बाजार भाव नसल्यामुळे काढणी करण्याचे काम थांबवले आहे. पीक काढणीला आले मात्र बाजार भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट मातीत गेले आहे.
....................................................
माझा दीड एकर शेतात कांदा पीक होते. मागील महिनाभरापासून बाजारभावात सुधारणा झाली नाही. शेतीची मशागत, कांदा रोपे लागवड, खुरपणी, औषधे फवारणी यामध्ये ७० हजार रुपये पाण्यात गेले आहे. तसेच पिकांची काढणी,भरणी, वाहतुक त्यातच बाजार भाव नसल्यामुळे हा खर्च पुन्हा तोट्याचा ठरणार आहे. मागील वर्षी १५ ते २० रुपये किलो बाजारभाव मिळाला होता. सध्या किलोला ५ ते ६ रुपये बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे आज दिड एकर क्षेत्रावर शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ आली आहे.
विजय काशिद, शेतकरी