शेतक-यांचा राज्यभरात कडकडीत बंद (फोटो स्टोरी)
By Admin | Updated: June 5, 2017 12:58 IST2017-06-05T10:58:28+5:302017-06-05T12:58:42+5:30
शेतकरी संपामध्ये सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसह इतर मागण्यांसाठी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे.

शेतक-यांचा राज्यभरात कडकडीत बंद (फोटो स्टोरी)
>ऑनलाइन लोकमत
सांगली/सोलापूर, दि.5 - शेतकरी संपामध्ये सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसह इतर मागण्यांसाठी सोमवारी (5 जून) राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शेतकरी बैलगाड्या, जनावरे आणि संपूर्ण कुटुंबासह रस्त्यावर उतरले आहेत.
शेतकरी संपाचे राज्यभरातील परिणाम
सोलापूर - सांगोला शहर तालुक्यात शेतक-यांनी कडकडीत बंद पाळला आहे. दूध संकलन, भाजीपाला, फळे विक्रीस न आल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसंच बाजार समितीतील भाजीपाल्याची आवकही मंदावली आहे. यामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत.
दूध पंढरी दूध संकलनानं शेतक-यांच्या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. तर पहाटेच्या सुमारास मानेगाव येथे शेतक-यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला.
पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, करमाळ्यासह अनेक ठिकाणी शेतक-यांचे रास्तारोको आंदोलन सुरू आहे.
सांगली - शेतक-यांच्या बंदला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. तासगाव तालुक्यातील मणेराजुरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून आंदोलकांनी निषेध व्यक्त केला.
काही ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त केला जात आहे. सार्वेड येथे बंदला हिंसक वळण प्राप्त झाले आहे. आंदोलकांनी याठिकाणी वाहनांचे टायर जाळले आहेत. वाळला तालुक्यातील चिकुर्डे, ऐतवडे बुद्रुक, कडेगाव तालुक्यातील वांगी, आसद, देवराष्ट्रे, जत तालुक्यातील वाळेखिंडी परिसरात कडकडीत बंद आहे.
तासगावात गाव बंद ठेवून कर्जमाफीबाबत घोषणा देत सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी फेरीदेखील काढली.