सेझमध्ये विमानतळ होऊ न देण्याचा शेतकरी संघटनेचा इशारा
By Admin | Updated: November 9, 2015 01:40 IST2015-11-09T01:40:22+5:302015-11-09T01:40:22+5:30
सेझमध्ये विमानतळ करण्यास आमचा विरोध असून, सेझबाधितांचा १५ टक्के परताव्याचा निर्णय बाकी असताना आणि सेझमुळे शेतकरी हवालदिल असताना

सेझमध्ये विमानतळ होऊ न देण्याचा शेतकरी संघटनेचा इशारा
राजगुरुनगर : सेझमध्ये विमानतळ करण्यास आमचा विरोध असून, सेझबाधितांचा १५ टक्के परताव्याचा निर्णय बाकी असताना आणि सेझमुळे शेतकरी हवालदिल असताना जर या भागात विमानतळ करायचा प्रयत्न झाला तर काहीही झाले, अगदी रक्त सांडले तरी आम्ही विमानतळ होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे विमानतळाचा चेंडू आपल्या भागात येऊ नये, यासाठी खेड तालुक्यातीलच वेगवेगळ्या भागांतील लोक तो टोलवून लावत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
काल खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विमानतळ करायचा असेल तर तो सेझमध्ये सरकारी जागेत करा, असे ते म्हणाले होते. त्यावर आज सेझबाधित शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि सेझमध्ये विमानतळाला विरोध असल्याचे सांगितले.
त्यावर ढवाण म्हणाले, आढळराव पाटील यांनी शेतकऱ्यांना विचारात घेऊन बोलले पाहिजे, ते शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत की उद्योगपतींचे? असा सवालही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
सेझ परिसरात विमानतळ होऊ नये, यासाठी ग्रामसभांचे ठराव शासनाकडे पाठविले आहेत. या भागातील जमिनी आम्ही औद्योगिकीकरणातून रोजगारनिर्मिती व्हावी, यासाठी दिल्या आहेत. त्यामुळे खासदारांनी दिशाभूल करू नये. याबाबत आढळराव पाटील म्हणाले, ‘‘सेझाबाधितांना १५ टक्के परतावा मिळावा, अशीच माझी भूमिका आहे, त्यासाठी मी सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. विमानतळ खेड तालुक्यातल्या कुठल्याही शेतकऱ्यांच्या जमिनी नव्याने संपादित करून करू नये, असे माझे म्हणणे आहे. तो करायचाच झाल्यास शेतकऱ्यांची परताव्याची जमीन वगळून जी जागा सेझ आणि सरकार यांच्या ताब्यात आहे, तेथे करावा असे माझे मत आहे. ज्या मंडळींचा तालुक्याशी आणि सेझच्या जमिनीशी संबंध नाही, त्या मंडळींच्या मोघम प्रतिक्रियांना काही अर्थ नाही.’’ (वार्ताहर)