शेतकऱ्यांना आता पावसाची ओढ, वरुणराजा रुसल्याने बळीराजा संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST2021-07-07T04:12:23+5:302021-07-07T04:12:23+5:30
साधारणपणे जून महिन्यात पावसाला सुरुवात होते. त्यानंतर या भागात पेरण्या जोरात सुरू होतात. त्याचबरोबर भीमा नदीपट्ट्यात साखर कारखाना ...

शेतकऱ्यांना आता पावसाची ओढ, वरुणराजा रुसल्याने बळीराजा संकटात
साधारणपणे जून महिन्यात पावसाला सुरुवात होते. त्यानंतर या भागात पेरण्या जोरात सुरू होतात. त्याचबरोबर भीमा नदीपट्ट्यात साखर कारखाना ऊस लागवड धोरणानुसार ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात असते. या वर्षी जून महिन्यात पावसाचे आगमन झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या भागात लगोलग ऊस लागवडी मोठ्या प्रमाणावर केल्या. मध्यंतरी पावसाला सुरुवात झाल्याने येथील बंधाऱ्याचे संपूर्ण ढापे काढण्यात आले होते. त्यामुळे असलेला शिल्लक पाणीसाठा सोडून देण्यात आला होता. मात्र, जूनअखेरीस व जुलै महिना सुरू होऊन काही दिवस उलटलेले असताना पावसाने मात्र दडी मारली आहे.ऊस लागवड केली,मात्र वरुणराजा अचानक रुसल्याने बळीराजा संकटात सापडला असून जर पाऊस नाही झाला तर पिके कशी जगवायची, असा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे. परिसरातील चांगली जोमदार आलेली बाजरी, मूग, कडधान्ये पिके पाण्याची खरी गरज असताना बंधारे कोरडे झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची आस आहे. या बंधाऱ्यावर शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा, सादलगाव, भैरू फराटेवाडी, शिरसगाव काटा, इनामगाव, पिंपळसुट्टी त्याचबरोबर दौंड तालुक्यातील कानगाव, हातवळण या गावांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन केल्या असून, शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली आहे. या परिसरात प्रामुख्याने ऊसशेती मोठ्या प्रमाणात असून त्याचबरोबर तरकारी पिकेही घेतली जातात. परंतु बंधाऱ्यात पाणीसाठा कमी झाल्याने पुढील काळात या परिसरात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांपुढे मोठे पाणीसंकट उभे राहणार आहे. त्याचबरोबर पाणीसाठी खोल गेल्याने परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पाईप खरेदी करत असून, नदीपात्रात पाईप लांबवण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
सध्या कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात असून, बियाणे खरेदी व लागवडींना शेतकऱ्यांचा मोठा खर्च झाला आहे. त्याचबरोबर या बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्याने शेतकऱ्यांना पाईप खरेदी करावी लागत आहे. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून, लवकरात पाऊस व्हावा म्हणून शेतकरी वाट पाहत आहे.
रामबापू फराटे
शेतकरी मांडवगण फराटा