वानवडी : येथील तात्या टोपे सोसायटी येथे राहणारे प्रसिद्ध जॉकी बी. प्रकाश ऊर्फ प्रकाश पुनाजी भोसले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४० वर्षांचे होते. त्यांच्यामागे आईवडील, पत्नी, दोन मुली, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. घोड्याच्या शर्यतीमध्ये लहान वयात जॉकी म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावणारे बी. प्रकाश यांचे नाव प्रसिद्ध होते. प्रसिद्ध जॉकी पुनाजी भोसले यांचा तो मुलगा होता.त्यांनी २०४७ घोड्यांच्या रेस जिंकल्या, तसेच १४७ क्लासिक रेस जिंकल्या. त्यांच्या या कारकिर्दीची दखल इंडियन टर्फ रेकॉर्ड बुकने घेतली. सलग दहा वर्षे इंडियन चॅम्पियन जॉकी म्हणून पदावर आपल्या कामगिरीचा त्यांनी ठसा उमटविला. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण आफ्रिका, मॉरिशस व हाँगकाँगमध्ये रेस जिंकल्या.पुणे, मुंबई, बंगलोर , कोलकत्ता , हैदराबाद, मद्रास व म्हैसूर येथे त्यांनी डर्बी रेस जिंकल्या.बी. प्रकाश यांनी मिस्टिकल घोडा या घोड्याच्या शर्यतीसाठी तयार केला आणि त्या घोड्याने दुबई वर्ल्ड कप रेसिंगमध्ये एकाच दिवशी सलग दोन रेस जिंकल्या. त्यांच्या आकस्मिक जाण्याने त्यांच्या जवळच्या मित्रांना व घरच्यांना धक्का बसला असून, डर्बी विश्वातील इतिहास घडविलेला माणूस गेल्याने खेळाचे खूप नुकसान झाल्याची भावना व्यक्त होते आहे. त्यामुळे त्यांना सन २००८ मध्ये ‘सासवड खेलरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते .सासवड येथील सुमर्डीचे सुपूत्रसन २०१२ मध्ये त्याने घोड्याच्या शर्यतीमधून निवृत्ती घेतली. त्यानतंर ते घोड्याचे ट्रेनर झाले. त्यानंतर नवीन जॉकी घडविले. त्यांचे मूळ गाव सासवड येथील पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याचे सुमर्डी होते.
प्रसिद्ध जॉकी बी. प्रकाश यांचे हृदयविकाराने निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 01:57 IST