कुटुंबाविषयीचे उत्तरदायित्व सर्वांचे
By Admin | Updated: February 3, 2015 01:06 IST2015-02-03T01:06:23+5:302015-02-03T01:06:23+5:30
आपली कुटुंबव्यवस्था ही आपली शक्ती आहे. तिचे उत्तरदायित्व फक्त आईचे नसून, कुटुंबातील साऱ्यांंचे असते, असे मत नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केले.

कुटुंबाविषयीचे उत्तरदायित्व सर्वांचे
पुणे : आपली कुटुंबव्यवस्था ही आपली शक्ती आहे. तिचे उत्तरदायित्व फक्त आईचे नसून, कुटुंबातील साऱ्यांंचे असते, असे मत नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केले.
बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळात त्या बोलत होत्या. ‘आई-बाबांची शाळा’ हा त्यांचा विषय होता. माध्यमांच्या सान्निध्यामुळे आजच्या मुलांना खूप ज्ञान आहे; पण त्यांच्या पालकांजवळ अनुभव आहे हे ते विसरतात. मुले मित्र-मैत्रिणींचा सल्ला घेतात. पालकांशी दुरावा ठेवतात. तो दूर करून पालकांवर श्रद्धा ठेवावी.
पालकांनी मुलांबरोबर सुखाबरोबर दु:खही वाटून घ्यावे, असे सांगून त्या म्हणाल्या, ‘‘पालकांना असलेली वेळेची कमतरता तसेच विविध प्रकारचे ताण संवादातून मुलांना कळतील. मुले आपली दौलत असून, त्यांच्यातील गुंतवणूक मोलाची आहे. संगोपनात सर्व देऊन टाका, हातचे राखून ठेवू नका. मुलांवर निरपेक्ष प्रेम करा. मुले संस्काराने बांधलेली राहतील, ती तुमच्यापासून दूर जाणार नाहीत.. मुलांचे दप्तर नाही तर मन तपासा, मुलांबरोबर वागताना आपला पेशन्स वाढवा, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. सध्या स्त्रीशक्तीचा बोलबाला आहे. त्यामुळे दुबळ्या आयांचा मुले तिरस्कार करतात; पण आईचे दु:ख जेव्हा त्यांना कळते, तेव्हा ती आईच्या जास्त जवळ जातात, असेही त्या म्हणाल्या. माधुरी सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)