...‘त्या’ कुटुंबातील सदस्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:15 IST2021-09-05T04:15:52+5:302021-09-05T04:15:52+5:30
बारामती : कोविडसारख्या गंभीर परिस्थितीत, ईएसआयने नवीन योजना चालवून कामगारांना अधिक लाभ देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कोविड रिलिफ स्किम ...

...‘त्या’ कुटुंबातील सदस्यांना
बारामती : कोविडसारख्या गंभीर परिस्थितीत, ईएसआयने नवीन योजना चालवून कामगारांना अधिक लाभ देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कोविड रिलिफ स्किम या योजनेअंतर्गत ईएसआयसीमध्ये नोंदणीकृत कर्मचारी कोविडमुळे मरण पावला असल्यास त्या कुटुंबातील सदस्यांना पात्रतेनुसार आजीवन निवृत्तिवेतन देण्याची तरतूद आहे, अशी माहिती कामगार राज्य विमा महामंडळाच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रभारी उपनिदेशक हेमंतकुमार पांडे यांनी दिली.
बारामती येथील भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या कामगार राज्य विमा महामंडळाच्या शाखेचे पांडे यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी पांडे पुढे म्हणाले, आजीवन निवृत्तिवेतन मिळण्यासाठी नोंदणीकृत कर्मचारी महिला असो किंवा पुरुष, त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यांना याचा लाभ मिळेल. अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना आणि कोविड रिलिफ स्किम सर्वांत महत्वाची आहे. जर ईएसआयमध्ये नोंदणीकृत लॉकडाऊन दरम्यान बेरोजगार झालेल्या कर्मचाऱ्याला ९० दिवसांसाठी त्याच्या वेतनाच्या ५० टक्के वेतन दिले जाते. त्यासाठी घरी बसून ऑनलाईनद्वारे अर्ज करू शकतो. अटल बिमित कल्याण योजनेअंतर्गत हे वेतन दिले जाते. त्यामुळे त्याला कठीण काळात आधार मिळेल, असे पांडे म्हणाले.
कामगार राज्य विमा महामंडळ ही एक सामाजिक सुरक्षा संस्था आहे. जी कामगारांना वैद्यकीय लाभ आणि रोख लाभ प्रदान करते. सामान्यत: कारखाने आणि आस्थापनांमध्ये कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या असतात. यामध्ये आजारपण, मातृत्व, तात्पुरते किंवा कायमचे अपंगत्व, रोग तसेच नोकरी दरम्यान अपघात किंवा इजा झाल्याने मृत्यू किंवा कमाईची क्षमता गमावणे आदींचा समावेश आहे. कामगार राज्य विमा अधिनियम १९४८ मध्ये दिलेल्या तरतुदींनुसार कामगारांना वेतन किंवा पेन्शनच्या स्वरुपात रोख लाभ देता येतो. महामंडळ स्वत:चे रुग्णालये, औषधालये, राज्य सरकारच्या सहयोगाने तसेच खासगी रुग्णालय आणि डॉक्टरांशी करार करून वैद्यकीय लाभ प्रदान करते. त्यांची कार्यालय संपूर्ण देशातील सर्व राज्यात आहेत.या योजनेत अनेक प्रकारचे लाभ दिले जातात. आजारपणाचा लाभ,कायमचे अपंगत्व लाभ,प्रसुती लाभ,बेरोजगारी भत्ता,अंत्यसंस्कार खर्चाची भरपाई आदीचा यामध्ये समावेश असल्याचे पांडे म्हणाले.
यावेळी बारामती ॲग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी देबराज दास, महाव्यवस्थापक संजय सस्ते, महाराष्ट्र राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष शिवाजीराव खटकाळे,बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संकेश्वर आदी उपस्थित होते.
——————————————
फोटोओळी— भारत सरकारच्या कामगार राज्य विमा महामंडळ बारामती येथील शाखा उदघाटन कार्यक्रमात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रभारी उपनिदेशक हेमंतकुमार पांडे यांनी बारामती ॲग्रोचे देबराज दास यांचा सन्मान केला.
०३०९२०२१ बारामती—०७
—————————————
बातमी फोटोसह आवश्यक