मुळशीत गुन्हेगारीला बसला लगाम
By Admin | Updated: October 28, 2015 01:11 IST2015-10-28T01:11:54+5:302015-10-28T01:11:54+5:30
मुळशी तालुक्यात मागील अनेक वर्षांत बोकाळलेली गुन्हेगारी काही प्रमाणात आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आल्याची तालुक्यात चर्चा आहे.

मुळशीत गुन्हेगारीला बसला लगाम
पौड : मुळशी तालुक्यात मागील अनेक वर्षांत बोकाळलेली गुन्हेगारी काही प्रमाणात आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आल्याची तालुक्यात चर्चा आहे. अतिसंवेदनशील तालुका म्हणून ओळख असलेल्या मुळशी तालुक्यात वाढत्या शहरीकरण, औद्योगिकीकरण, बांधकाम व्यवसाय, मोठ्या प्रमाणात होणारे जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार यातून अनेक गुन्हेगार जन्माला आल्याने मागील काही वर्षांत तालुक्यात गुन्हेगारी वाढीस लागली होती.
परिणामी तालुक्यात सर्वत्र दहशत व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याला तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांचा कचखाऊपणाही कारणीभूत होता. तालुक्यात भडकलेल्या टोळीयुद्धात एकापाठोपाठ एक अशा अनेकांचा बळी गेल्यानंतर पोलीस खात्याला जाग आली व वरिष्ठ स्तरावरून सूत्रे हालू लागली. या बिघडलेल्या परिस्थितीतून सावरण्यासाठी सक्षम पोलीस अधिकारी आणणे गरजेचे वाटल्याने दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा गणेश मोरे यांच्या रूपाने एक कर्तव्यतत्पर पोलीस अधिकारी मुळशीला मिळाला. मोरे यांनी चार महिन्यांत ५६ जणांवर मोक्का लावण्याची धाडसी कारवाई केल्याने येथील गुन्हेगारीला पहिला हादरा दिला. त्यानंतर सारंगकर व आता विश्वंभर गोल्डे असे एकापाठोपाठ कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अधिकारी पौड चौकीला आल्याने तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व विभागीय कार्यालय यांनी संयुक्तपणे धडक मोहीम राबविल्यामुळे सहा महिन्यांत शांतता प्रस्थापित होताना दिसत आहे.