तरुणांमध्ये साहित्य, संस्कृतीबाबत अनास्था
By Admin | Updated: June 6, 2015 23:53 IST2015-06-06T23:53:19+5:302015-06-06T23:53:19+5:30
पंजाबमध्ये संत नामदेव महाराजांनंतर मराठी भाषेची पताका डॉ.सदानंद मोरे यांनी फडकावली. आजच्या तरुण पिढीमध्ये साहित्य- संस्कृतीविषयी अनास्था दिसून येते.

तरुणांमध्ये साहित्य, संस्कृतीबाबत अनास्था
पिंपरी : पंजाबमध्ये संत नामदेव महाराजांनंतर मराठी भाषेची पताका डॉ.सदानंद मोरे यांनी फडकावली. आजच्या तरुण पिढीमध्ये साहित्य- संस्कृतीविषयी अनास्था दिसून येते. डॉ. मोरे व डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या साहित्याचा प्रचार व प्रसार झाल्यास निश्चितच मोठी साहित्य व सांस्कृतिक चळवळ उभी राहील, असे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात शनिवारी दिवंगत महापौर भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मोरे यांना पिंपरी-चिंचवड भूषण पुरस्कार मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, महापौर शकुंतला धराडे, डॉ. मोरे व सुरेखा मोरे, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, संयोजक माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे, नगरसेविका उषा वाघेरे उपस्थित होते. मुंडे म्हणाले की, ‘‘महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदावर डॉ. मोरे यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी मी आणि आमदार हेमंत टकले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. डॉ. मोरे हेच या पदाला न्याय देतील व या पदाची उंची वाढवतील.’’ छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण केले जाते. मात्र, त्यांचा आदर्श घेतला जात नाही. त्यांना काही लोक आपल्या सोयीपुरते ‘बोन्साय’ करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी पर्शियन शब्द राज्यकारभारातून काढून प्राकृत मराठी व शालिवाहन काळातील शब्द वापरून मराठी भाषेस राज्यभाषेचा दर्जा दिला. जोपर्यंत मराठी भाषा ही सत्ता चालविण्याची, न्यायदानाची भाषा होत नाही, तोपर्यंत आपल्याला खरे स्वातंत्र्य मिळाले, असे म्हणता येणार नाही, असे डॉ. मोरे म्हणाले. डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘समाजाचा सामाजिक, राजकीय परिस्थितीचा समतोल अभ्यास करणाऱ्या निवडक लोकांमध्ये डॉ. मोरे यांचा समावेश होतो. सध्याच्या पिढीत राजकारणाबद्दलची तुच्छता दिसते. परंतु, समाजात बदल करण्यासाठी राजकारण आवश्यक आहे. जगात अनेक सामाजिक व सांस्कृतिक बदल राजकारणामुळेच झाले आहेत. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची दिशा देण्यामध्ये लेखकांचा खूप मोठा वाटा आहे. मात्र, देशात स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणात लेखकांना महत्त्व उरले नाही. जगाचा सामाजिक अभ्यास केल्यावर कळते की, प्रथम सांस्कृतिक परिवर्तन घडते आणि नंतरच सामाजिक व राजकीय बदल घडतात. यात लेखकांचा मोठा हिस्सा असतो.’’ स्वागत संयोजक वाघेरे यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षण मंडळ सदस्य नाना शिवले, तर आभार उपमहापौर वाघेरे यांनी मानले. (प्रतिनिधी)