पुण्यात खोट्या नंबरची रिक्षा जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 03:14 IST2017-08-10T03:14:18+5:302017-08-10T03:14:18+5:30
पुणे महानगरपालिका परिवहन मंडळ व स्वारगेट वाहतूक विभाग यांनी अवैध प्रवासी वाहतूक करणाºया रिक्षाचालकांवर कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई करीत असताना गंगाधाम चौकात एक बनावट नंबर असलेली रिक्षा पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

पुण्यात खोट्या नंबरची रिक्षा जाळ्यात
बिबवेवाडी : पुणे महानगरपालिका परिवहन मंडळ व स्वारगेट वाहतूक विभाग यांनी अवैध प्रवासी वाहतूक करणाºया रिक्षाचालकांवर कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई करीत असताना गंगाधाम चौकात एक बनावट नंबर असलेली रिक्षा पोलिसांच्या जाळ्यात अडकली.
मागील पंधरा दिवसांपूर्वीच स्वारगेट वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुदामराव पाचोरकर व सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप चोपडे यांनी बनावट नंबर असलेल्या रिक्षा पकडून, मार्केटयार्ड पोलिसांच्या ताब्यात दिल्या होत्या. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त देविदास पाटील यांच्या सूचनेनुसार या भागात रिक्षाचे कागदपत्रे व रिक्षावरील चासी नंबर इंजीन नंबर तपासण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. ८ तारखेला सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप चोपडे, हवालदार भिलारे, पोलीस नाईक जाधव यांना तपासणी करते वेळी एका रिक्षाचा संशय आला. रिक्षा चालकाकडे पेपरची मागणी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी परिवहन कार्यालयाकडे या रिक्षाचा नंबर एमएच १२ एफए ०५९० हा तपासणीसाठी दिला असता, हा नंबर बसचा नंबर असल्याचे आढळून आले. रिक्षाचालक वसीम नसीम अन्सारी (वय ३२, रा.व्हीआयटी कॉलेज चौक, अप्पर) याला मार्केट यार्ड पोलिसांच्या ताब्यात दिले. ही रिक्षा चोरून तिच्या वर खोटा नंबर टाकून हा आरोपी रिक्षा चालवत होता. अशा प्रकारच्या अनेक रिक्षा पुणे शहरात फिरत असतील त्याच्यावर आता कारवाई करण्यास वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली आहे, असे मत सहायक पोलीस आयुक्त देवीदास पाटील यांनी व्यक्त केले.