सदाबहार गीतांनी सजली अमर बन्सी
By Admin | Updated: January 24, 2015 00:07 IST2015-01-24T00:07:53+5:302015-01-24T00:07:53+5:30
‘काय बाई सांगू’, ‘शब्दांभोवती फिरशी माझ्या’, ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’ या आणि अशी अनेक सदाबहार, गाजलेल्या गीतांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.

सदाबहार गीतांनी सजली अमर बन्सी
पुणे : ‘काय बाई सांगू’, ‘शब्दांभोवती फिरशी माझ्या’, ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’ या आणि अशी अनेक सदाबहार, गाजलेल्या गीतांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. निमित्त होते सिम्बायोसिस सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाचे. अमर ओक यांचा ‘अमर बन्सी’ हा कार्यक्रम सादर झाला.
सिम्बायोसिस संस्था आयोजित २१व्या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी संस्थेच्या डॉ. आंबेडकर स्मारक खुल्या प्रेक्षागृहात झाले. उद्घाटन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी दीप प्रज्वलित करून केले.
या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब.मुजुमदार, प्रधान संचालिका विद्या येरवडेकर, सांस्कृतिक महोत्सवाचे संचालक ब्रिगेडिअर राजीव दिवेकर व्यासपीठावर होते. सिम्बायोसिसची माजी विद्यार्थिनी, अभिनेत्री ईशा केसकर हिला सांस्कृतिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
विविध संगीतकारांची अवीट गाणी या वेळी सादर करण्यात आली. त्याला साथसंगत करणारे अभिजित भदे (रिदम), दर्शना जोग (सिंथेसायझर), विक्रम भट (ढोलक-ढोलकी) आणि प्रसाद जोशी (तबला) यांच्या एकलवादनाबरोबर त्यांची जुगलबंदी रंगली. निवेदन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. (प्रतिनिधी)
मेलडीमध्ये रमले रसिक
४उद्घाटन, पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अमर ओक यांचा ‘अमर बन्सी’ हा कार्यक्रम झाला. ‘प्रथम तुला वंदितो’ या गणेशवंदनेने कार्यक्रमाला सुरुवात केली. ‘काय बाई सांगू’, ‘मन उधाण वाऱ्याचे’, अशा मराठी गीतांबरोबरच ‘दिल चाहता है’मधील ‘तनहाई’सारखी गाणी सादर केली. ‘खमाज’ या रागावर आधारित गाण्यांची मेलडी आणि संगीतकार एस. डी. बर्मन यांच्यापासून ते शंकर एहसान लॉय यांच्यापर्यंत विविध संगीतकारांची गाणी सादर केली. तसेच १० इंचापासून ते ३४ इंचाच्या बासरीपर्यंत वेगवेगळ्या बासऱ्यांचा वापर करुन विविध संगीतकारांच्या वेगवेगळ्या गाण्यांमध्ये कसा केला हे त्यांनी प्रात्यक्षिकांसह सादर केले.