‘हरित लवादा’कडून मुदतवाढ
By Admin | Updated: January 23, 2015 00:15 IST2015-01-23T00:15:07+5:302015-01-23T00:15:07+5:30
‘राष्ट्रीय हरित लवादा’ने दिलेल्या आदेशाविरोधात पालिकेकडून सर्वोच्च न्यायालयात ५ फेब्रुवारी पूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे.

‘हरित लवादा’कडून मुदतवाढ
पुणे : ‘वारजे ते विठ्ठलवाडी’ या मार्गावर मुठा नदीपात्रात महापालिके कडून तयार करण्यात येत असलेल्या रस्त्याबाबत ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने दिलेल्या आदेशाविरोधात पालिकेकडून सर्वोच्च न्यायालयात ५ फेब्रुवारी पूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी महापालिकेने गुरुवारी लवादासमोर प्रतिज्ञापत्र सादर करून, मुदतवाढ घेतली असून, ही मुदत ५ फेब्रुवारीपर्यंत असल्याचे अतिरिक्त नगर अभियंता विवेक खरवडकर यांनी मुख्यसभेत सांगितले. दरम्यान, सिंहगड रस्त्यासाठी ‘खडकवासला ते पर्वती’दरम्यान असलेल्या कालव्या वरून नवीन रस्ता करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी मुख्यसभेत पर्यायी रस्त्याबाबत विचाराणा केली. तसेच, नदीपात्रातील रस्त्याबाबत पालिका काय निर्णय घेणार, याची विचारणा केली. तसेच, महापालिकेने ‘हरित लवादा’पुढे योग्य बाजू मांडली नाही, त्यामुळे निकाल विरोधात केल्याचा आरोप नागपुरे यांनी केला. त्यानंतर युगंधरा चाकणकर, विकास दांगट, दिलीप बराटे, विशाल तांबे, अप्पा रेणुसे, अशोक येनपुरे, सभागृह नेते सुभाष जगताप यांनी हा रस्ता गरजेचा आहे. स्थानिक नागरिकांच्या लिखित सूचना घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. तसेच, हा रस्ता मार्गी लागेल, यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. तर, जगताप यांनी नदीपात्रातील सध्याच्या रस्त्यास न्यायालयाने परवानगी दिल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावे, अशी सूचनाही केली.
त्यानंतर खुलासा करताना, खरवडकर म्हणाले, की ‘हरित लवादा’च्या आदेशानुसार १५ दिवसांत भराव काढून टाकावा लागणार
आहे. परंतु, सुमारे ८० हजार ट्रक राडारोडा आहे. त्यामुळे कार्यवाहीस वेळ लागणार आहे. तसेच, महापालिकेला सर्वोच्च न्यायालयात जायचे आहे. यासंदर्भात आज ‘हरित लवादा’कडे प्रतिज्ञापत्रक सादर केले होते. त्यांनी आजपासून १५ दिवस अर्थात ५ फेब्रुवारीपर्यंत परवानगी दिली आहे. रस्त्याला पर्याय निर्माण होणार आहे. (प्रतिनिधी)
‘पर्वती जलकेंद्र ते हिंगणे’पर्यंतचा कॅनॉलकाठचा रस्ता तयार करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. तसेच, विश्रांतीनगर येथील रस्ता रुंदीकरणासाठीही तरतूद करण्यात आली आहे. ही कामे झाल्यास सिंहगड तसेच सिंहगड रस्त्याला पर्याय म्हणून बंद पाइपलाइन (कालवा) कडेचा रस्ता विकसित करण्यात येणार. या रस्त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद असून, विश्रांतीनगर येथील रस्ता रुंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, त्यासाठी सर्व तयारीही प्रशासनाने पूर्ण केल्याचे खरवडकर यांनी सांगितले.