स्मशानभूमीत अघोरी पूजा करणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:07 IST2021-02-05T05:07:20+5:302021-02-05T05:07:20+5:30
चाकण : भोसे (ता. खेड) येथील स्मशानभूमीत एका भोंदूबाबाने आपल्या पाच साथीदारांसह अनिष्ट प्रथा पूजा केल्याचा प्रकार समोर आला ...

स्मशानभूमीत अघोरी पूजा करणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश
चाकण : भोसे (ता. खेड) येथील स्मशानभूमीत एका भोंदूबाबाने आपल्या पाच साथीदारांसह अनिष्ट प्रथा पूजा केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पाच लाख तेरा हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
आनंद सुरेंदर जैन (वय ३५, रा. शमसिरगंज, हैद्राबाद) यांनी फिर्याद दाखल केली आहे. तर साधूबाबा चंद्रकांत नायर, बाळासाहेब मारुती मोहिते (रा. मोहितेवाडी, ता. खेड), नरेंद्र हनुमंत गायकवाड (वय ५२, रा. अशोक टॉकीज, पिंपरी), गणेश मारुती चव्हाण (वय ३८, रा.चव्हाण कॉलनी,भोसरी) व अन्य दोन अनोळखी अशा सहा जणांवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट प्रथा व जादूटोणा प्रतींबद्ध कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२० ते २९ जानेवारी २०२१ या दरम्यानच्या कालावधीत साधूबाबा चंद्रकांत नायर व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीला सांगितले की, साधूबाबा नायर याच्या अंगात अतींद्रियशक्ती असल्याने आणि कामक्या देवी गोहाटी येथील कपाळ अघोरी मठात २५ वर्षे शिक्षा ग्रहण केली असल्याचे सांगून तुमच्या आर्थिक व इतर घरगुती अडचणी तांत्रिक व अनिष्ट पूजेद्वारे जादूटोणा करून सोडवून देतील. यासाठी मोबाईलमधील विविध प्रकारच्या तांत्रिक व्हिडीओ क्लिक दाखवून, मंत्र केलेलं कुंकू देऊन तसेच घरी होम हवन करून विश्वास संपादन केला. यातून कायमची मुक्तता करण्यासाठी पाच हजार रुपये खर्च करावे लागतील असे सांगून फिर्यादीकडून सर्व रक्कम ताब्यात घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस अधिक तपास करत आहेत.
चौकट
भोसे येथील स्मशानभूमीत शुक्रवारी (दि.२९) मध्यरात्री १. ३० च्या सुमारास साधूबाबाने आपल्या पाच साथीदारांसह अनिष्ट प्रथा असलेली पूजा करत असताना स्थानिक लोकांना याची शंका आल्याने त्यांनी १०० नंबरला फोन करून या घटनेची माहिती दिली होती. चाकण पोलिसांनी नरेंद्र हनुमंत गायकवाड व गणेश मारुती चव्हाण यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पाच लाख तेरा हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. इतर फरारी आरोपींचा शोध घेण्यात आहे.