लोहगाव विमानतळ विस्तारणार
By Admin | Updated: March 12, 2017 03:14 IST2017-03-12T03:14:56+5:302017-03-12T03:14:56+5:30
लोहगाव विमानतळावर नवीन टर्मिनल तसेच कार्गो कॉम्प्लेक्स आणि चार नवीन विमान पार्किंगला विमानतळ विकास प्राधिकरणाच्या बैठकीत शनिवारी अंतिम मंजुरी

लोहगाव विमानतळ विस्तारणार
पुणे : लोहगाव विमानतळावर नवीन टर्मिनल तसेच कार्गो कॉम्प्लेक्स आणि चार नवीन विमान पार्किंगला विमानतळ विकास प्राधिकरणाच्या बैठकीत शनिवारी अंतिम मंजुरी देण्यात आली. त्यामुळे विमानतळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला असून प्रवाशांनाही अनेक सोयी-सुविधा मिळणार आहेत.
विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार अनिल शिरोळे यांच्या उपस्थितीत शनिवारी लोहगाव विमानतळ येथे बैठक झाली. यामध्ये विमानतळावर करण्यात येणा-या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस विमानतळ संचालक अजय कुमार, मराठा चेंबर आॅफ कॉर्मर्स चे अनंत सरदेशमुख, येरवडा पोलिस स्टेशन चे वाहतूक अधिकारी बाजीराव मुळे आदि उपस्थित होते. या बैठकीत नवीन टर्मिनल इमारत व कार्गो ची निर्मितीसाठी ४७५ कोटी ३९ लाख रुपये, ४ नवीन विमान पार्किंग आणि टॅक्सी लिंक रोडसाठी १७ कोटी ७ लाख रुपये आणि टर्मिनलमधील विद्युतीकरणासाठी १० कोटी ६ लाख रुपयांच्या कामांना अंतिम मंजूरी देण्यात आल्याची माहिती शिरोळे यांनी दिली. त्याचप्रमाणे विमानतळाच्या प्रवेशद्वाराच्या डावीकडील ०.७५ एकर जागा भारतीय हवाई दलाकडून प्रवेश रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मिळणार असल्याचे देखील शिरोळे यांनी संगितले.
नवीन टर्मिनलमुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होईल. असे सरदेशमुख यांनी सांगितले.
कार्गो कॉम्प्लेक्सचा उद्योगांना लाभ
लोहगाम विमानतळावरील अपुऱ्या जागेमुळे माल वाहतुक करण्यास मोठी मर्यादा होती. पुण्यातील ३० टक्क्यांहून अधिक मालवाहतुकीसाठी मुंबईला जावे लागत होते. नवीन कार्गो कॉम्प्लेक्सला मंजुरी मिळाल्यामुळे येथूनच मालवाहतुक करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे खर्चातही मोठी वाढ होते. ‘या कॉम्प्लेक्समुळे आयात व निर्यातदारांना मोठा फायदा होईल,’ असे अजय कुमार यांनी सांगितले.