रहाटणीकरांचा अस्तित्व मोर्चा
By Admin | Updated: September 25, 2016 05:45 IST2016-09-25T05:45:04+5:302016-09-25T05:45:04+5:30
रहाटणीगाव या नावाच्या अस्तित्वासाठी गावकऱ्यांनी लढा सुरू केला असून येथील छत्रपती शिवाजी पुतळा ते साई चौकापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. त्यात आबालवृद्धांसह

रहाटणीकरांचा अस्तित्व मोर्चा
रहाटणी : रहाटणीगाव या नावाच्या अस्तित्वासाठी गावकऱ्यांनी लढा सुरू केला असून येथील छत्रपती शिवाजी पुतळा ते साई चौकापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. त्यात आबालवृद्धांसह तरुणही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. स्थानिक नगरसेवक, पोलीस प्रशासन व महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
महापालिकेच्या नकाशावरून रहाटणीगावचे नाव हद्दपार करण्याचा परिसरातील व्यापारी, प्रशासन, व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक यांचा डाव असून, तो हाणून पाडण्यासाठी ग्रामस्थांनी मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी चौकातून सकाळी मोर्चाला सुरुवात झाली. कार्यकर्ते रहाटणी हद्दीतील दुकानांवर ‘ही रहाटणी आहे.’’ असे स्टीकर चिटकवीत होते. पुढे हा मोर्चा कोकणे चौक, शिवार चौक ते साई चौकात पोहोचला. तिथे सांगता झाली. या वेळी अनेक ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या. एक नागरिक म्हणाला, ‘‘रहाटणी हे गाव पिंपळे सौदागरच्या ४० वर्षे अगोदरचे आहे. रहाटणी चौक ते साई चौक रस्त्यावर विविध प्रकारचे मॉल्स आहेत. स्पॉट १८, साई चौक, शिवार चौक , ड क्षेत्रीय कार्यालय, कोकणे चौकात मॉल्स फक्त रहाटणी भागात आहेत. हा पूर्ण रस्ता रहाटणीच्या हद्दीतून जातो. तरी पालिका प्रशासनाने बीआरटी रस्त्यावरील पीएमपी थांब्याला शिवार चौक, पिंपळे सौदागर बस थांबा, साई चौक, पिंपळे सौदागर बस थांबा असे लिहिले आहे, हे का?.’’(वार्ताहर)
गावाच्या नावासाठी एकवटले ग्रामस्थ
मतभेद दूर सारत सर्व ग्रामस्थ या मूक मोर्चात सहभागी झाले होते. गावाची ओळख मिटविण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी रहाटणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढला. यादरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाकड पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तैनात होते. मोर्चा मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी म्हणून सांगवी वाहतूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी तैनात होते.
मोर्चा कशासाठी?
हॉटेल्स, रुग्णालये, शाळा, मोठेमोठे गृहप्रकल्प, विविध खासगी कार्यालये, आपल्या पत्रव्यवहाराच्या पाट्यावर सर्रास जाणूनबुजून पिंपळे सौदागर असा उल्लेख करीत आहेत. त्यामुळे रहाटणी गावाच्या नावाचा अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला होता.
आंदोलन तीव्र करू
संबंधित व्यापारी, व्यावसायिक , बांधकाम व्यावसायिक, पालिका प्रशासन, तसेच इतरही शासकीय, निमशासकीय कार्यालये यांनी दखल घेतली नाही, तर पुन्हा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागणार आहे, असा इशाराही या वेळी देण्यात आला.