ताम्हिणी, लोणावळ्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:09 IST2021-07-23T04:09:07+5:302021-07-23T04:09:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : इतके दिवस कोकणात धुवांधार पडत असलेल्या पावसाने कालपासून सह्याद्री पर्वतरांगा ओलांडून पश्चिम महाराष्ट्रात जोरदार ...

Excessive rainfall in Tamhini, Lonavla | ताम्हिणी, लोणावळ्यात अतिवृष्टी

ताम्हिणी, लोणावळ्यात अतिवृष्टी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : इतके दिवस कोकणात धुवांधार पडत असलेल्या पावसाने कालपासून सह्याद्री पर्वतरांगा ओलांडून पश्चिम महाराष्ट्रात जोरदार आगमन केले असून ताम्हिणी, लोणावळा, वळवण परिसरात गेल्या २४ तासात अतिवृष्टी झाली आहे. पुढील २४ तासात पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे शहर व जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. बुधवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे ४.९ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे या हंगामातील सर्वाधिक ३९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दावडी ४७०, डुंगरवाडी ४१० मिमी पाऊस पडला होता. शिरगाव ३७०, लोणावळा, वळवण, भिरा ३४०, अम्बोणे, कोयना (पोफळी) ३२०, खोपोली ३१० मिमी पावसाची सकाळपर्यंत नोंद झाली होती.

शहर व जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. शहरात आज दिवसभर आकाश ढगाळ होते. अधूनमधून पावसाची एखादी जोरदार सर येत होती. त्यामुळे जुलै महिन्यात प्रथमच रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साठलेले दिसून येत होते. पावसामुळे शहरातील अनेक चौकांमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत होते.

पावसाचा जोर शहराच्या वेगवेगळ्या भागात कमी जास्त असल्याचे दिसून आले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे ५.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. पाषाण ११.४, लोहगाव ६.२ मिमी पाऊस झाला आहे. खडकवासला परिसरात २०, वारजे १७.८, कोथरुड ६ तर लोणी काळभोर येथे ०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात उद्या तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे शहर व परिसरात उद्या दिवसभरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Web Title: Excessive rainfall in Tamhini, Lonavla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.