दौंडला अपवाद वगळता बंडखोरी नाही
By Admin | Updated: February 14, 2017 01:41 IST2017-02-14T01:41:54+5:302017-02-14T01:41:54+5:30
दौंड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी बंडोबा थंड झाल्याने काही अपवाद वगळता कोठेही बंडखोरी झाली नाही.

दौंडला अपवाद वगळता बंडखोरी नाही
दौंड : दौंड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी बंडोबा थंड झाल्याने काही अपवाद वगळता कोठेही बंडखोरी झाली नाही. केडगाव-पारगाव गटातून पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा डॉ. वंदना मोहिते यांनी बंडखोरी केली असल्याने त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे लिंगाळी गणातून राष्ट्रवादीचे नेते नागसेन धेंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन पवार कुटुंबीयांवरील निष्ठा कायम ठेवली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची संख्या पाहता राष्ट्रवादी, रासपा-भाजपा-आरपीआय या पक्षात बंडखोरी होईल, असे एकंदरीत चित्र होते. मात्र, बंडखोरी थंड करण्यासाठी नेते मंडळींना यश आल्याने बंडखोरी शमलेली आहे. एकंदरीतच राष्ट्रवादी, रासपा-भाजपा-आरपीआय युती, शिवसेना, काँग्रेस, बसपा, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी पक्ष यांसह अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान राष्ट्रवादी आणि रासपा-भाजपा-आरपीआय युतीने सगळ्या जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष, बसपा यांनी काही जागांवरच उमेदवार उभे केले असल्याची वस्तुस्थिती आहे. गटातटाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुल-थोरात यांच्यात लढत होईल, असे एकंदरीत चित्र आहे.
आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. विरोधक सत्ताधारी रासपाचे आमदार राहुल कुल यांना भीमा-पाटस कारखान्याच्या मुद्यावरुन धारेवर पकडतील, ही वस्तुस्थिती आहे. (वार्ताहर)