परीक्षेतील गैरप्रकार; प्राध्यापक बडतर्फ
By Admin | Updated: February 1, 2017 05:18 IST2017-02-01T05:18:13+5:302017-02-01T05:18:13+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे घेतल्या गेलेल्या विविध परीक्षांदरम्यान गैरप्रकार केल्याप्रकरणी एकूण १० प्राध्यापक व प्राचार्यांवर कारवाई करण्यात

परीक्षेतील गैरप्रकार; प्राध्यापक बडतर्फ
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे घेतल्या गेलेल्या विविध परीक्षांदरम्यान गैरप्रकार केल्याप्रकरणी एकूण १० प्राध्यापक व प्राचार्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातील तीन प्राध्यापकांना बडतर्फ करण्याची शिफारस विद्यापीठाने केली आहे तर काहींना पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा आणि परीक्षेचे काम करण्यास बंदी घातली आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे मे २0१६मध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या गणित-२ या विषयाच्या परीक्षेदरम्यान तीन प्राध्यापकांनी प्रश्नपत्रिकेच्या पानाचा फोटो काढून व्हॉट्सअॅपद्वारे फिरवला असल्याची धक्कादायक माहिती चौकशीनंतर समोर आली आहे. त्यामुळे विद्यापीठाने संबंधित प्राध्यापकांना बडतर्फ करावे. तसेच पुन्हा सेवेत रुजू करून घेऊ नये, अशी शिफारस विद्यापीठाने सिंहगड इन्स्टिट्यूटकडे केली आहे. व्हॉट्सअॅपद्वारे पेपर प्राध्यापकांनीच फोडला असल्याचा प्रकार विद्यापीठाने केलेल्या चौकशीदरम्यान समोर आला. तसेच परीक्षेदरम्यान गैरप्रकार केल्याप्रकरणी प्राध्यापकांवर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात केली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका महाविद्यालयाच्या प्राचार्याने चार विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज भरलेले नसताना तसेच त्यांना बैठक क्रमांक नसताना संबंधित विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने विद्यार्थी हिताचा विचार करून संबंधित प्राचार्यांना विद्यार्थ्यांनी शुल्क भरल्यापासून प्रति आठवडा १५०० रुपयेप्रमाणे दंड केला. त्याचप्रमाणे अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रिकल मेजरमेंट अॅण्ड इन्स्ट्रूमेंटेशन विषयाच्या प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारल्याने एका प्राध्यापकाला ५ हजार रुपये दंड केला आहे. तसेच तीन वर्षे परीक्षेच्या कामावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला
आहे. अहमदनगर जिल्ह्यातील विळदघाट येथील एका
प्राध्यापकावर तसेच नाशिक जिल्ह्यातील पंचवटीच्या फार्मसी महाविद्यालयातील एका प्राध्यापकावर एक वर्ष परीक्षेचे काम करण्यास बंदी घातली
आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे कारवाईचे पत्रक विद्यापीठच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
विद्यापीठातर्फे एम.एस्सी. जैवविविधता या विषयाची ८० गुणांची परीक्षा घेतली जाते. मात्र, आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील तीन प्राध्यापकांनी प्रश्नपत्रिका ८० गुणांची असताना केवळ ५६ गुणांची तयार केली. त्यामुळे या तीन प्राध्यापकांवर एक वर्ष परीक्षेचे कामकाज पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे.