माजी विद्यार्थीही सरसावले!
By Admin | Updated: December 15, 2014 01:40 IST2014-12-15T01:40:57+5:302014-12-15T01:40:57+5:30
कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेची ती जागा परत घेण्यासाठी आता या संस्थेतील माजी विद्यार्थीही सरसावले आहे

माजी विद्यार्थीही सरसावले!
बारामती : कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेची ती जागा परत घेण्यासाठी आता या संस्थेतील माजी विद्यार्थीही सरसावले आहे. जागा विद्या प्रतिष्ठानकडे हस्तांतरीत करण्यासाठी अजित पवार यांना अध्यक्ष केले नव्हते. तर त्यांच्या माध्यमातून याच संस्थेचा विकास व्हावा, अशी भूमिका होती. असा सवाल त्यांनी केला असून जागा परत मिळविण्यासाठी कंबर कसली आहे.
नोकरीनिमित्ताने बाहेरगावी असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना ‘लोकमत’मधील वृत्त वाचल्यानंतर सर्व प्रकार माहिती झाला. त्यानंतर गावातील नातेवाइकांशी संर्पक साधून झालेल्या प्रकाराची माहिती घेतली. मात्र कसल्याही परिस्थितीत संस्थेची जमीन जाऊ देणार नाही, असा निर्धार या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
काऱ्हाटी (ता. बारामती) येथील कृषी उद्योग मूलशिक्षण संस्था १९५२ मध्ये डॉ. अच्युतराव आगरकर यांनी सुरू केली. त्या वेळी बारामती तालुक्यात अवघ्या तीनच शाळा होत्या. देश स्वातंत्र्यानंतर अवघ्या पाच वर्षांत शाळा सुरू करून काऱ्हाटी, माळवाडी, बाबुर्डी, देऊळगाव रसाळ, जळगाव कडेपठार, जळगाव सुपे आदी भागातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊ शकले. परिणामी घरातील एक तरी व्यक्ती नोकरीस लागण्यास मदत झाली. त्यामुळे आज या भागातील मुले डॉक्टर, शिक्षक, पोलीस, पीएसआय, आयपीएस अशा अनेक मोठ्या हुद्द्यावर आहेत. या भागाबरोबर कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बदलली ती या कृषी मूलशिक्षण संस्थेमुळे. आज या शाळेची नाळ या परिसरातील घराघरांशी जोडली आहे. आज आम्ही ज्या मातीत लहानाचे मोठे झालो, त्या मातीला विकू देणार नाही. जमीन परत मिळविण्यासाठी न्यायालयात दाद मागण्याचा ठराव केला आहे.