माजी सरपंच श्यामराव शेंडगे यांना कोठडी
By Admin | Updated: February 9, 2017 02:58 IST2017-02-09T02:58:47+5:302017-02-09T02:58:47+5:30
यवतचे माजी सरपंच श्यामराव शेंडगे यांना दौंड न्यायलायाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली

माजी सरपंच श्यामराव शेंडगे यांना कोठडी
यवत : यवतचे माजी सरपंच श्यामराव शेंडगे यांना दौंड न्यायलायाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली.
सरपंच असताना शेंडगे यांनी ग्रामपंचायत निधीचा अपहार व आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी श्यामराव शेंडगे व ग्रामविकास अधिकारी डी. बी. केकाण यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ते फरारी होते.
सोमवारी (दि. ६) शेंडगे दौंड पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात आले होते, त्याच वेळी पोलिसांनी त्यांना अटक केली.
शेंडगे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी बारामती सेशन न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी अर्ज केला होता. मात्र, बारामती न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळावा, यासाठी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर मंगळवारी (दि. ७) सुनावणी होणार होती. तत्पूर्वी, ते पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी (दि. ६) दौंड तहसील कार्यालयात आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.
अटक करण्यात आल्यानंतर यवत पोलिसांनी शेंडगे यांना दौंड न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांनी रक्तदाब वाढला असल्याने वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने वैद्यकीय उपचार सुरू असेपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यांना येरवडा (पुणे) येथील कारागृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले. (वार्ताहर)