नोटांपुढे सगळे विषय बासनात
By Admin | Updated: November 15, 2016 03:58 IST2016-11-15T03:58:22+5:302016-11-15T03:58:22+5:30
केंद्र सरकारच्या १ हजार व ५००च्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे नोटांच्या टंचाईची अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. नोटा बदलून घेणे

नोटांपुढे सगळे विषय बासनात
पुणे : केंद्र सरकारच्या १ हजार व ५००च्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे नोटांच्या टंचाईची अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. नोटा बदलून घेणे किंवा एटीएम सेंटरमधून नोटा मिळविणे, याच एका उद्योगात बहुतेकांचा वेळ जात असून त्यामुळे विविध कारणांनी निघणारे मोर्चे तर थंडावलेच; पण विधान परिषद व महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची राजकीय चर्चाही थांबली आहे. उमेदवारी हेच ‘लक्ष्य’ ठरविलेल्यांचे ‘लक्ष’ही आता नव्या नोटा कशा मिळवायच्या याकडेच लागले आहे.
नव्या नोटांची उपलब्धता हाच सध्याचा सार्वत्रिक विषय झाला आहे. बँका तसेच एटीएम समोरच्या रांगांचा कानोसा घेतला असता, त्यांच्या चर्चांमधूनही निवडणुकांचा मुद्दा बाजूला पडला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयापूर्वी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भल्यामोठ्या संख्येने निघणारे मराठी क्रांती मूक मोर्चे तसेच त्यावरची प्रतिक्रिया म्हणून निघणारे बहुजन क्रांती मूक मोर्चे हाच सर्वाधिक चर्चेचा विषय होता. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीवरील चर्चेेने जोर धरला. दरम्यान महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचीही मोर्चेबांधणी सुरू झाली. नव्याने झालेली प्रभागरचना, कोणाला उमेदवारी मिळेल, कोणाची सत्ता येणार अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, आता नोटांच्या चर्चांनी त्यावर मात केली आहे.
चर्चेचा कोणताही विषय नोटांच्या विषयावरच येऊन पोहोचू लागला आहे. मंगळवारी (दि. ८) हा निर्णय जाहीर झाल्यानंतर एक-दोन दिवसांत परिस्थिती पूर्ववत होईल, असा नागरिकांना विश्वास होता. मात्र, आता आठवडा होत आला तरीही नव्या नोटा मिळत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. नव्या नोटांचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांमधील नाराजी कायम आहे. (प्रतिनिधी)