सर्वजण झाले खामोश

By Admin | Updated: January 10, 2015 01:02 IST2015-01-10T01:02:41+5:302015-01-10T01:02:41+5:30

पुणे-पिंंपरी-चिंचवडच्या भावनात्मक आठवणी सांगून प्रख्यात अभिनेते शत्रुघ्न सिंन्हा यांनी उपस्थितांवर मोहीनी टाकली. भारदस्त आवाजाच्या सिन्हांनी सर्वांना खामोश केले.

Everyone was silent | सर्वजण झाले खामोश

सर्वजण झाले खामोश

पिंपरी : विविध भाषांमध्ये उच्चारल्या जाणाऱ्या शत्रुघ्न या नावाबद्दलच्या गमती-जमती सांगत, पुणेरी पाट्यांच्या आठवणींनी खळखळून हसवित, चित्रपट क्षेत्रातील वाटचाल, घेतलेले परिश्रमांबद्दल दिलखुलासपणे, भरभरून बोलत, ‘तेरी आशिकी से पहले...’ अशा विविध काव्यपंक्ती, पुणे-पिंंपरी-चिंचवडच्या भावनात्मक आठवणी सांगून प्रख्यात अभिनेते शत्रुघ्न सिंन्हा यांनी उपस्थितांवर मोहीनी टाकली. भारदस्त आवाजाच्या सिन्हांनी सर्वांना खामोश केले.
चिंचवडस्टेशन येथे बिगसिनेमामध्ये औचित्य होतं, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पिंपरी-चिंचवड विभागातील विस्तारित महोत्सव उद्घाटन सोहळ्याचे. औपचारिक उद्घाटन सिन्हा यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर महापौर शकुंतला धराडे, आयुक्त राजीव जाधव, पीफचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, खासदार श्रीरंग बारणे, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे, रजत कपूर, अभिनेते संदीप कुलकर्णी, एमटीडीसीच्या संचालिका वैशाली चव्हाण, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, समन्वयक प्रवीण तुपे, माजी महापौर योगेश बहल आदी उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्यात सिन्हा यांच्या कारर्किदीचा आढावा घेणारा माहितीपट दाखविण्यात आला. तसेच डॉ. पटेलांनी गौरवमूर्तींचा उल्लेख ‘शत्रू’ असा केल्याने पुढील मनोगतात. सिन्हांनी उपस्थितांना भारावून टाकले. मनोगत व्यक्त करायला सिन्हा ध्वनीवर्धकावर आले आणि ‘खामोश’, असे म्हणाले. त्यावर उपस्थितांनी जोरदार टाळ्यांची दाद दिली. सिन्हा म्हणाले, ‘‘पुणे ही संस्कृती आणि कलेची नगरी आहे. साहित्यिक, वैज्ञानिक, प्रज्ञावंत, कलावंतांना घडविणारी नगरी आहे. एफटीआयमध्ये असताना कोणी खोड्या काढल्या की ‘गप्प बस नाहितर चिंचवडला पाठविन तुला.’’ अशा शहरात मी अनेकवेळा आलो आहे. मला दोन शहरे आवडतात. एक म्हणजे माझी जन्मभूमी पटना, दुसरे म्हणजे मला कलाक्षेत्रात ज्या शहराने घडविले ते पुणे. त्यामुळे मी या दोन शहरांचा आयुष्यभर ऋणी राहील.’’
मराठीविषयी बोलताना सिन्हा म्हणाले, ‘‘चालत्या बसमध्ये चढू नका नाही तर जीवास मुकाल’, ‘कामापुरता मामा, केला इशारा जाता जाता, हे वाक्य मला आठवतात’’ आयुक्त जाधव म्हणाले, ‘‘मुलभूत सुविधा देण्याबरोबरच मानसिक आरोग्य टिकविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. कलाधोरणाचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत आहे.’’
डॉ. पटेल म्हणाले, ‘‘जगातील स्पंदने काय आहेत, हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा महोत्सव आहे. पुणे सांस्कृतिक, पिंपरी औद्योगिक क्रांती करणारे शहर आहे.’’ (प्रतिनिधी)

४‘तेरी आशिकी से पहले मुझे कौन जानता था...’ अशा काव्यपंक्तीचा दाखला देत सिन्हा म्हणाले, ‘प्रतिभा सर्वांजवळच असते. आपण ती ओळखायला हवी. कलेला वाव घ्यायला हवा. सिद्ध केल्याशिवाय माणूस प्रसिद्ध होत नाही. अभिनयाचा पाया रंगभूमी आहे. त्या रंगभूमीवरून अनेक कलावंत घडले आहेत. मीही ‘पती-पत्नी और मैं’ या नाटकातून काम केले होते. त्यातून मला अभिनयाची शक्ती मिळाली. उत्कृष्ठ कलावंत घडण्यासाठी रंगभूमीवर काम करण्याची गरज आहे. अभिनय आणि राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना मला काही योगदान देता आले. याबद्दल मी आनंदी आहे.’’

शत्रुधन, शत्रुधून, शत्रुगण आणि शत्रु
४नावाबद्दलच्या आठवणी सिन्हा यांनी सांगितल्या. ते म्हणाले, ‘‘सुरूवातीला एस.पी. सिन्हा हे नाव काही दिवस चित्रपटात दिसायचे. मी नाव बदलून घेतले. ‘शत्रुघ्न’ असे ठेवले. मी ज्यावेळी वेगवेगळ्या प्रांतात जायचो. त्यावेळी तेथे माझे नाव वेगवेगळ्या प्रकारे घेतले जायचे. पंजाबी लोक मला शत्रूग्न, सिंधी शत्रूधुन, साऊथवाले शत्रूघन्न, बिहारचे लोक शत्रूधन नावाने पुकारले जायचे. घन हो या धन हो, प्रेम हे महत्वाचे आहे. जिव्हाळा महत्वाचा आहे. डॉ. पटेल मला लडीवाळपणे ‘शत्रू’ म्हणतात. शत्रू म्हणजे, दुष्मण असे म्हणतात. परंतु धन्य आहे, संत तुकाराम महाराजांची भूमी की तिथे या ‘शत्रू’ला आपलेसे केले. प्रेम केले, असा तुमचा ‘शत्रू’ व्हायला आवडेल. काम चांगले असले तर नाव चालेल यावर माझा विश्वास आहे.’’

Web Title: Everyone was silent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.