खासगी रुग्णालयातही ससेहोलपट
By Admin | Updated: November 16, 2016 03:37 IST2016-11-16T03:37:04+5:302016-11-16T03:37:04+5:30
नोटाबंदीमुळे खासगी रुग्णालयातील रुग्णांची ससेहोलपट होत आहे. जुन्या नोटा केवळ सरकारी रुग्णालयांमध्ये चालणार असून,

खासगी रुग्णालयातही ससेहोलपट
पुणे : नोटाबंदीमुळे खासगी रुग्णालयातील रुग्णांची ससेहोलपट होत आहे. जुन्या नोटा केवळ सरकारी रुग्णालयांमध्ये चालणार असून, खासगी रुग्णालयात या नोटा स्वीकारल्या जाऊ नयेत, असा आदेश राज्य सरकारतर्फे काढण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाबरोबरच सामान्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आदेशाची प्रत रुग्णालयांमध्ये दर्शनी ठिकाणी लावण्यात आली आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, धनादेश, डिमांड ड्राफ्ट अशा माध्यमातून रुग्णांनी बिलाची रक्कम भरावी, अशा सूचना रुग्णालयांच्या प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.
९ नोव्हेंबरपासून खासगी रुग्णालयांनी जुन्या नोटा स्वीकारणे बंद केले होते. त्यानंतर, रुग्णांची गैैरसोय टाळण्यासाठी ९ नोव्हेंबर रोजी राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे खासगी रुग्णालयांना या नोटा स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार, पुढील तीन दिवस या नोटा स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली. दि. १२ नोव्हेंबर रोजी पुन्हा या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. निर्णयामध्ये वारंवार बदल होत असल्याने खासगी रुग्णालयांच्या प्रशासनामध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. हा गोंधळ टाळण्यासाठी नेमके आदेश मिळावेत, या आशयाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्याची माहिती, एका खासगी रुग्णालयाच्या लेखा विभागातर्फे देण्यात आली.
पुणे शहरात अनेक नामांकित खासगी रुग्णालये आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून तसेच राज्यातील इतर ठिकाणांहून अनेक लोक उपचारांसाठी पुण्यात येतात. रुग्णाला शस्त्रक्रिया अथवा औैषधोपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागल्यास त्यांना किमान ३-४ दिवस मुक्काम करावा लागतो. नोटाबंदीच्या निर्णयामुळे स्थानिक तसेच बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांना मोठा फटका बसला आहे. काही खासगी रुग्णालयांतर्फे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आॅनलाईन बँकिंग अथवा धनादेशाद्वारे बिल भरण्यास सांगितले जात आहे. काही रुग्णालयांमध्ये धनादेश स्वीकारण्यास नकार दिला जात असून, डिमांड ड्राफ्टचा पर्याय दिला जात आहे. पैैसे भरण्याच्या या पर्यायी मार्गांची सोय अथवा सवय नसल्याने रुग्णांमध्ये संतप्त वातावरण पाहायला मिळत आहे.