इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST2021-07-14T04:13:37+5:302021-07-14T04:13:37+5:30
‘मेस्टा’ संघटनेची मागणी बारामती : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. कोरोना ...

इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही
‘मेस्टा’ संघटनेची मागणी
बारामती : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. कोरोना कालावधीमध्ये शाळा बंद होत्या. आता सुरू करण्यासाठी शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण अनिवार्य आहे. अनुदानित व जिल्हा परिषदेच्या शाळांना समग्र शिक्षा अभियानांर्तगत देखभाल दुरुस्तीसाठी पटावर आधारित अनुदान देण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील इंग्रजी शाळांनाही अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे (मेस्टा) पुणे जिल्हाध्यक्ष सतीश सांगळे यांनी केली आहे.
कोरोनामुळे दोन वर्षांपासून इंग्रजी शाळा बंद आहेत. त्यामुळे फी (शुल्क) येणे बंद असून शासन वेळोवेळी वेगवेगळे शासन निर्णय काढत पालकांना फी भरण्यापासून परावृत्त करत आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांपुढे आर्थिक संकट निर्माण झालेले आहे. ७ जुलैच्या शासन निर्णयानुसार शाळा सुरू करताना स्वच्छतागृहांची देखभाल, थर्मामीटर, आॅक्सिमीटर, साबन, सॅनिटायझर, स्कूल बसचे निर्जंतुकीकरण करण्याची अट टाकण्यात आली आहे. यासाठी निधी आवश्यक असून तो इंग्रजी शाळांकडे नाही. शासन फी घेण्यास प्रतिबंध आहे. त्याचबरोबर गेल्या तीन वर्षांपासून आरटीई (मोफत शिक्षण) प्रतिपूर्तीची रक्कमदेखील देत नाही. मग इंग्रजी माध्यमाच्या शाळा कशी सुरू करायची हा प्रश्न आहे.
मेस्टा संघटनेच्या शाळांनी पालकांच्या व शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोरोना कालावधीत मृत्यू पावलेल्या पालकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण करून सामाजिक दायित्व निभावले आहे. यामुळे राज्य सरकारने इंग्रजी शाळांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून इंग्रजी शाळांना समग्र शिक्षा अभियानांर्तगत देखभाल दुरुस्ती अनुदान द्यावे, अशी आग्रही मागणी शासनाकडे केली आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय माळशिकारे, बारामती तालुकाध्यक्ष राहुल बनकर, बारामती उपाध्यक्ष दत्तात्रेय काळे, संघटक संग्राम मोकाशी, इंदापूर तालुकाध्यक्ष दादासाहेब शिरसट, दौंड तालुकाध्यक्ष मच्छिंद्र कदम, जुन्नर संघटक नितीन पाटील, दौंड संघटक नितीन कदम, भोर तालुकाध्यक्ष दत्तात्रेय साळवी, पुरंदर तालुकाध्यक्ष बाळासाहेब झगडे, खेड तालुकाध्यक्ष शीतल टिळेकर, संघटक विनोद जगताप उपस्थित होते.