फरासखाना स्फोटाच्या एक वर्षानंतरही तपास अधांतरीच
By Admin | Updated: July 10, 2015 02:17 IST2015-07-10T02:17:01+5:302015-07-10T02:17:01+5:30
पाच दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी पुण्याच्या मध्यवस्तीतील फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये बॉम्बस्फोट घडवत पोलीस यंत्रणेला आव्हान दिले होते.

फरासखाना स्फोटाच्या एक वर्षानंतरही तपास अधांतरीच
पुणे : मध्यप्रदेशातील खांडवा कारागृह फोडून पसार झालेल्या पाच दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी पुण्याच्या मध्यवस्तीतील फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये बॉम्बस्फोट घडवत पोलीस यंत्रणेला आव्हान दिले होते. या पाच दहशतवाद्यांपैकी दोघाजणांना एप्रिल महिन्यात आंध्रप्रदेश पोलिसांनी चकमकीदरम्यान कंठस्नान घातले होते. यातील तीन दहशतवादी अद्यापही मोकाट असून या स्फोटाच्या एक वर्षानंतरही दहशवतवाद्यांना बेड्या ठोकण्यात यंत्रणांना यश आलेले नाही.
मोहम्मद एजाजुद्दीन उर्फ एजाज उर्फ रियाज उर्फ राहुल (वय ३२), मोहम्मद अस्लम अयुब खान (वय २८), अमजद रमजान खान (वय ३५), झाकीर हुसैन बदुल हुसैन ऊर्फ सादिक (वय ३३), मोहम्मद सलिक ऊर्फ सल्लू अब्दूल हकीम (वय ३२, सर्व रा. गणेश तलाई, खांडवा, मध्यप्रदेश) अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका प्रचारकावर गोळीबार केल्याच्या गुन्ह्यात हे पाचही दहशतवादी खांडवा कारागृहात बंद होते. तेथून पसार झाल्यानंतर त्यांनी राहणीमानात बदल केला होता. एजाजुद्दीन आणि अस्लम या दोघांनी खांडवा कारागृहामधून १ आॅक्टोबर २०१३ रोजी पलायन केले होते. त्यांच्यासोबत डॉ. अबू फैजल इम्रान, मेहबुब उर्फ गुड्डु इस्माईल खान, अमजद रमजान खान, झाकीर हुसेन उर्फ सादीक उर्फ विकी डॉन उर्फ विनयकुमार बद्रुल हुसेन हे चौघेही होते. पळून गेल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच डॉ. अबू फौजलला अटक करण्यात आली होती. हे सर्व संशयीत सिमी सिमी आणि इंडीयन मुजाहीदीनचे हे सर्वजण ‘डेडीकेटेड’ दहशतवादी आहेत. खांडव्यामधून पसार झाल्यानंतर त्यांनी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट घडवला होता. त्यासाठी सातारच्या न्यायालयामधून एका पोलिसाची दुचाकी चोरण्यात आली होती. या दुचाकीच्या डिक्कीमध्ये बॉम्ब पेरुन ही दुचाकी पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आली होती.
गेल्या वर्षी १० जुलै रोजी दुपारी पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट झाला होता. दहशतवादी हल्ल्याचा कायमस्वरुपी धोका असलेल्या दगडुशेठ मंदिराच्या अगदी जवळच हा स्फोट झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहीले होते. फरासखाना बॉम्बस्फोट घडविल्यानंतर हे संशयीत दक्षिणेत पळाले होते. एटीएसने त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला होता. दहशतवादी पुण्यात घुसण्यापासून ते कोल्हापुरला पळून जाईपर्यंतच्या काही मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. या सीसीटीव्हीमधून एजाजुद्दीनसह अन्य दहशतवाद्यांचे स्पष्ट फुटेज पोलिसांना मिळाले होते. एटीएसने राज्यभर या दहशतवाद्यांची छायाचित्र असलेली पत्रके आणि पोस्टर्स वाटली होती.
एटीएससह सर्वच यंत्रणा मागावर
फरासखान्याचा स्फोट घडवल्यानंतर फरारी झालेल्या या दहशतवाद्यांनी बिजनौरमध्ये वास्तव्य केले होते. तेथे घरामध्ये बॉम्ब तयार करीत असताना प्रेशर कुकरचा स्फोट झाला होता. या घटनेत मेहबूब गुड्डू भाजला होता, अशी माहिती एटीएसकडे आहे. त्यानंतर पसार झालेले दहशतवादी उत्तर प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगालमध्ये फिरत होते. त्यांचे शेवटचे ‘लोकेशन’ कर्नाटकातील होसेपेटे येथे मिळाले होते. हे सर्व दहशतवादी हैदराबादमध्ये लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. एप्रिल महिन्यात आंध्र प्रदेश पोलिसांसोबत नालगोंडा जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत एजाजुद्दीन आणि मोहम्मद अस्लम या दोघांना कंठस्थान घालण्यात आले होते. त्यांचे साथीदार अमजद, सादिक आणि मोहम्मद सलिक अद्याप फरार आहेत. एटीएससह देशातील सर्वच यंत्रणा त्यांच्या मागावर असून, अद्याप कोणत्याही यंत्रणेला त्यांचा ठावठिकाणा समजलेला नाही.