टंचाई मिटविण्यासाठी जिल्ह्यात ४२ कोटी ८७ लाखांना मंजुरी
By Admin | Updated: September 29, 2015 02:21 IST2015-09-29T02:21:48+5:302015-09-29T02:21:48+5:30
जलयुक्त शिवार योजनेमुळे यंदा दुष्काळी परिस्थितीतही काहीसा दिलासा मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेमार्फत यंदा जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीदार करण्यासाठी

टंचाई मिटविण्यासाठी जिल्ह्यात ४२ कोटी ८७ लाखांना मंजुरी
पुणे : जलयुक्त शिवार योजनेमुळे यंदा दुष्काळी परिस्थितीतही काहीसा दिलासा मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेमार्फत यंदा जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीदार करण्यासाठी येत्या वर्षांत ४२ कोटी ८७ लाखांची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले. यात आंबेगाव तालुक्याला सर्वाधिक निधी, तर दौंड तालुक्यात सर्वाधिक कामे होणार आहेत.
या वर्षी जूनची सरासरी ओलांडल्यानंतर पावसाने दोन महिने दडी मारली होती. त्यामुळे पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली होती. श्रावण महिन्यातही ४९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात परतीचा चांगला पाऊस झाला. हा पाऊस प्राधान्याने जलयुक्तची ज्या भागात कामे सुरू आहेत त्या परिसरात झाल्याने येथे चांगला पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या परिसराला काहीसा दिलासा मिळाला आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागामार्फत २0१५-१६ या वर्षासाठी ४२ कोटी ८७ लाखांच्या कामांना मंजुरी दिली आहे. यातून को.प. बंधारे, साठवण बंधारे, वळण बंधारे, पाझर तलाव तसेच दुरुस्तीची कामे घेतली जाणार आहेत. यात ४0१.२५ लाखांचा सर्वाधिक निधी हा आंबेगाव तालुक्याला मिळाला असून, यातून १८ कामे हाती घेण्यात येणार आहेत. तर, सर्वांत कमी ११६.६२ लाखांचा निधी वेल्हे तालुक्याला मिळाला असून, ६ कामे घेण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी जिल्हा परिषदेमार्फत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सुमारे ३ कोटी ९४ लाखांची कामे केली आहेत.
जी गावे टंचाईग्रस्त आहेत, त्या गावांना जादाचा निधी देण्यात आला असून, तेथे नवीन कामे व पूर्वीच्या कामांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामांमुळे त्या भागातील भूजलाची पाण्याची पातळी वाढून तेथील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार असल्याचे कंद यांनी सांगितले.