इंदापूर नगरपालिकेचा पर्यावरणपूरक विसर्जन रथ पोहोचणार घरोघरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:11 IST2021-09-19T04:11:21+5:302021-09-19T04:11:21+5:30

इंदापूर : महाराष्ट्र शासनाच्या कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करीत अनंत चतुर्थीला खबरदारी म्हणून इंदापूर नगरपालिकेचा पर्यावरण पूरक ...

The environmentally friendly immersion chariot of Indapur Municipality will reach every house | इंदापूर नगरपालिकेचा पर्यावरणपूरक विसर्जन रथ पोहोचणार घरोघरी

इंदापूर नगरपालिकेचा पर्यावरणपूरक विसर्जन रथ पोहोचणार घरोघरी

इंदापूर : महाराष्ट्र शासनाच्या कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करीत अनंत चतुर्थीला खबरदारी म्हणून इंदापूर नगरपालिकेचा पर्यावरण पूरक विसर्जन रथ इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार ( दि. १९ सप्टेंबर ) रोजी घरोघरी पोहोचणार आहे. तरी नागरिकांनी गणेश विसर्जनासाठी घराबाहेर पडून गर्दी करु नये, असे आवाहन मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी केले आहे.

नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या की, इंदापूर शहरामध्ये नगरपरिषदेच्या वतीने चार पर्यावरणपूरक असे विसर्जन रथ व पूजा विधी केलेले निर्माल्य टाकण्यासाठी चार वाहने सजवून तयार आहेत. दोन्ही वाहने शहरातील गल्लोगल्ली, दारोदारी संपूर्ण शहरांमध्ये नागरिकांच्या घरांमधील श्री गणेशाची मूर्ती विसर्जन करण्याकरिता घेणार असून, प्रत्येक विसर्जन रथाबरोबर नगरपरिषदेच्या चार कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. त्यामुळे शहरातील कोणत्याही नागरिकांनी श्री गणेशाचे विसर्जन करण्याकरिता घराबाहेर न पडता आपल्या घरातील श्री गणेशाची मूर्ती सदर रथामध्ये विसर्जन करण्याकरिता द्यावी. वेगळे केलेले पूजा विधीचे निर्माल्य जसे, फुले, हार, दुर्वा व इतर साहित्य वेगळे ठेवून विसर्जन रथासोबत असलेल्या वाहनांमध्ये द्यावे. आपल्या घरातील मूर्ती इंदापूर नगरपरिषदेने तयार केलेल्या पर्यावरणपूरक विसर्जन रथामध्ये द्यावी, असे आवाहनही शहा यांनी केले आहे.

इंदापूर नगरपालिकेने पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विसर्जन बनवण्यात आलेल्या रथासोबत, विसर्जन रथाचे नियोजन करण्याकरिता नियंत्रक म्हणून सहा नियंत्रक कर्मचारी यांची नियुक्ती केलेली आहे. यामध्ये विलास चव्हाण, अल्ताफ पठाण, लिलाचंद पोळ, अशोक चिंचकर, सुनील लोहिरे व दीपक शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे.

नागरिकांनी गर्दी टाळावी

इंदापूर शहरातील नागरिकांनी गर्दी टाळावी, गर्दी करू नये. कोरोना व्हायरससारख्या संसर्गजन्य आजाराचा धोका टाळावा व घरीच थांबून सुरक्षित राहावे. सदर श्री गणेशाची मूर्ती विसर्जन करण्याकरिता देताना, गर्दी करू नये, तोंडावर मास्कचा वापर करावा. स्वच्छ हात धुऊन गणपती विसर्जन रथात द्यावा. यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी केले.

Web Title: The environmentally friendly immersion chariot of Indapur Municipality will reach every house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.