पर्यावरणाचे संवर्धन महत्त्वाचे
By Admin | Updated: February 6, 2017 05:51 IST2017-02-06T05:51:29+5:302017-02-06T05:51:29+5:30
भविष्यात निसर्ग पर्यावरणाच्या समस्या भेडसावणार आहे. तेव्हा पर्यावरणासाठी सेवाभावी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित यावे

पर्यावरणाचे संवर्धन महत्त्वाचे
दौंड : भविष्यात निसर्ग पर्यावरणाच्या समस्या भेडसावणार आहे. तेव्हा पर्यावरणासाठी सेवाभावी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित यावे, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले.
स्व. रोहिणी रवींद्र जाधव स्मारक ट्रस्टच्या राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. गेल्या २१ वर्षांपासून सलग या संस्थेच्या वतीने पुरस्कार दिले जात आहे, ही निश्चितच वाखाणण्याजोगी बाब आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येने विचार संपणार नाही. गोळ्या घालण्याची परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली आहे.
डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी यांना गोळ्या घालणारे अद्याप सापडले नाही. ही शोकांतिका म्हणावी लागेल. धर्म आणि देवाच्या नावावर राजकारण आणि धार्मिकदृष्ट्या होणारे शोषण याला आळा बसला पाहिजे. याचप्रमाणे अंधश्रद्धेचा बाजार थांबणे गरजेचे आहे, असे डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले.
रोहिणी जाधव स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र जाधव यांनी गेल्या २१ वर्षांतील संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. वीरधवल जगदाळे, सचिन कुलथे यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. विकास देशपांडे, रवी पवार यांनी सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी लुंड परिवाराच्या वतीने लातूरच्या सेवालय संस्थेतील एड्सग्रस्तांसाठी ५0 ब्लँकेट दिले. या वेळी अशोक मुनोत, डॉ. प्रेमकुमार भट्टड, बादशाह शेख, दिवाकर लुंड, शैलेश पितांबरे, सचिन गायकवाड, श्याम लुंड, प्रशांत धनवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
(वार्ताहर)