पुणे : प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट अॅडमिशन्स या संस्थेच्या प्रवेश परीक्षेचीच बनावट गुणपत्रिका देऊन चार विद्यार्थ्यांनी एमबीए़ला प्रवेश घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या चार विद्यार्थ्यांवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील तीन विद्यार्थी हे झारखंडचे असून एक जण बिहारचा आहे. अपराजिता राज (रा. बिस्तुपूर कालीमाली, जमशेटपूर), भोमिरा (मुफसिल बिहार, जि. गया), दिव्या सिंग (ग्लोमोरी सिगबम), शैलेश कुमार सिंग (रा. जमशेटपूर) अशी या चौघांची नावे आहेत.याप्रकरणी डॉ. सुरभी प्रवीण जैन यांनी पुणे विद्यापीठाच्या वतीने फिर्याद दिली आहे. याबाबत डॉ. जैन या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे प्राध्यापक आणि हेड ऑफ डिपार्टमेंट मॅनेजमेंट सायन्सेस या विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहतात. अेटीएमए (एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट अॅडमिशन्स) या परीक्षेद्वारे एमबीएसाठी प्रवेश दिला जातो. २०१८ -१९ या शैक्षणिक वर्षासाठी एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट या संस्थेच्या बनावट गुणपत्रिका सादर करुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सादर करून एमबीएसाठी प्रवेश घेतला.त्यानंतर विद्यापीठाकडून या गुण पत्रिकांची खातरजमा करण्यासाठी त्या अेटीएमएकडे पाठविण्यात आल्या. तेव्हा त्यांच्याकडून या गुणपत्रिका आम्ही दिलेल्या नसून त्या बनावट असल्याची माहिती देण्यात आली. हा प्रकार उघड झाल्यानंतर आता पहिले वर्ष संपत असताना विद्यापीठाच्या वतीने या चार विद्यार्थ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे अधिक तपास करीत आहेत.
प्रवेश परीक्षेच्या बनावट गुणपत्रिकेद्वारे मिळवला MBAमध्ये प्रवेश, चार विद्यार्थ्यांवर पुण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 08:56 IST