नाझरे धरणातील पाणी पिण्यासाठी पुरेसे
By Admin | Updated: October 9, 2016 04:14 IST2016-10-09T04:14:10+5:302016-10-09T04:14:10+5:30
पुरंदर तालुक्यातील नाझरे धरण ४१ टक्के भारले आहे. या धरणावर अवलंबून असलेल्या बारामती तालुक्यातील मोरगाव प्रादेशिक नळ योजनेवर अवलंबून असलेल्या १७ गावांचा

नाझरे धरणातील पाणी पिण्यासाठी पुरेसे
मोरगाव : पुरंदर तालुक्यातील नाझरे धरण ४१ टक्के भारले आहे. या धरणावर अवलंबून असलेल्या बारामती तालुक्यातील मोरगाव प्रादेशिक नळ योजनेवर अवलंबून असलेल्या १७ गावांचा पिण्याच्या पाणीप्रश्न सध्या सुटला आहे. तसेच, दिवसाआड पाणीपुरवठा केला, तर पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत पाणी पुरू शकेल, असा अंदाज आहे.
नाझरे धरणची एकूण पाणीसाठा क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट आहे. गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे धरणात ४१ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. पाण्यासाठी होणारी वणवण थांबली आहे. मोरगाव प्रादेशिक नळ योजनेवर आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, आंबीमाळवाडी, जोगवडी-मोरगाव, तरडोली, मासाळवाडी, लोणी भापकर, बाबुर्डी, माळवाडी लोणी, काऱ्हाटी, कऱ्हावागज, अंजनगाव, जळगाव कडेपठार, जळगाव सुपे, भिलारवाडी आदी १७ गावे अवलंबून आहेत. नाझरे धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने जिरायती भागात पाण्याची समस्या निर्माण झाली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या पावसामुळे धरणातील साठा वाढला आहे. पाणीसाठा कमी असून सर्व पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले आहे. रब्बी पिकांसाठी पुरंदर व बारामती या तालुक्यांत पाणी यंदा सोडले जाणार नाही. (वार्ताहर)