इंजिनिअरिंगची क्रेझ ओसरली!
By Admin | Updated: July 7, 2015 04:51 IST2015-07-07T04:51:24+5:302015-07-07T04:51:24+5:30
शहरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील तब्बल ५० टक्के जागांवर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी फिरकलेच नसल्याची माहिती ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आली आहे.

इंजिनिअरिंगची क्रेझ ओसरली!
पुणे : राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जागा काही वर्षांपासून रिक्त राहत असल्याचे दिसून येत असताना आता चालू शैक्षणिक वर्षात शहरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील तब्बल ५० टक्के जागांवर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी फिरकलेच नसल्याची माहिती ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आली आहे. त्यावरून दिवसेंदिवस इंजिनिअरिंगची क्रेझ कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
राज्य तंत्र शिक्षण विभागातर्फे २०१५-१६ या शैक्षणिक वर्षातील दिलेल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या सुमारे १ लाख ६५ हजार जागांसाठी केवळ १ लाख ७ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे यंदाही अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान डीटीईतर्फे अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या प्रवेशपक्रियेला सुरुवात करण्यात आली असून, पहिल्या फेरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी २ जुलै ते ५ जुलै या कालावधीत प्रवेश घेणे आवश्यक होते. विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेतला; परंतु अनेक महाविद्यालयांतील ५० टक्के जागा रिक्त आहेत. अभियांत्रिकी कॉलेज आॅफ पुणे (सीओईपी), विश्वकर्मा इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (व्हीआयटी), आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग (एआयएसएसएमएस), पुणे इस्टिट्यूट आॅफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) तसेच एमआयटी या अधिक मागणी असलेल्या महाविद्यालयांचा समावेश आहे.
सीओईपी, व्हीआटी या दोन अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा, अशी राज्यातील प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याची इच्छा असते. मात्र, सोओईपीमध्ये पहिल्या प्रवेश फेरीतून प्रवेश दिलेल्या ६६२ जागांपैकी केवळ ३४९ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. हीच परिस्थिती शहरातील इतर नामांकित महाविद्यालयांमधील आहे. अभियांत्रिकी आणि आयआयटीमधील प्रवेशप्रक्रिया एकाच वेळी सुरू असल्याने बरेच विद्यार्थी आयआयटीला प्राधान्य देत आहेत. तसेच, काही विद्यार्थी सध्या फारशी मागणी नसलेल्या शाखेत प्रवेश न घेता मेकॅनिकल इंजिनिअरिंगला अधिक प्राधान्य देत आहेत. एकदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला दुसऱ्यांदा प्रवेश घेण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे काही विद्यार्थी दुसऱ्या फेरीनंतर प्रवेश घेतील, असे सीओईपीच्या प्रवेशप्रक्रियेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
४अभियांत्रिकी कॉलेज आॅफ पुणे (सीओईपी), विश्वकर्मा इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (व्हीआयटी), आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग (एआयएसएसएमएस), पुणे इस्टिट्यूट आॅफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) तसेच एमआयटी या महाविद्यालयांचा समावेश आहे.