शेवटी एकत्र पाहिल्याने गुन्हा होत नाही सिद्ध
By Admin | Updated: March 22, 2017 03:30 IST2017-03-22T03:30:07+5:302017-03-22T03:30:07+5:30
कोणताही गुन्हा एखाद्या आरोपीविरुद्ध सिद्ध व्हायचा असेल, तर गुन्ह्यातील सर्व घटना या पुराव्यानिशी सिद्ध व्हाव्या लागतात.

शेवटी एकत्र पाहिल्याने गुन्हा होत नाही सिद्ध
पुणे : कोणताही गुन्हा एखाद्या आरोपीविरुद्ध सिद्ध व्हायचा असेल, तर गुन्ह्यातील सर्व घटना या पुराव्यानिशी सिद्ध व्हाव्या लागतात. केवळ शेवटी एकत्र पाहिले यावर आरोपींना शिक्षा देता येणार नाही. नयना पुजारी हिच्या मृत्यूपूर्वी ती आणि आरोपी एकत्र कधी आणि कोठे भेटले हे सरकार पक्षाला न्यायालयात सबळ पुराव्यानिशी सिद्ध करता आलेले नाही, असा युक्तिवाद नयना पुजारी खून खटल्यातील बचाव पक्षाने न्यायालयात केला.
संगणक अभियंता नयना पुजारी हिचे अपहरण केल्यानंतर, तिच्यावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. याप्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या न्यायालयात सुरू आहे. बचाव पक्षातर्फे अॅड़ बी. ए. अलूर, अॅड़ रणजित ढोमसे पाटील, अॅड़ अंकुशराजे जाधव हे काम पाहात आहेत.
७ आॅक्टोबर २००९ रोजी रात्री १० नंतर आणि दुसऱ्या दिवशी ८ आॅक्टोबरला सायंकाळी ६.३०पर्यंत नयना पुजारी हिचा मृतदेह मिळेपर्यंत १८ ते २० तास नयना कोणाच्या ताब्यात होती आणि कुठे होती हे सरकार पक्षाने न्यायालयात सिद्ध केले नाही. योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम हे नयनाला तिच्या मरण्याआधी एकत्र कधी आणि कुठे भेटले हे सरकार पक्षाला न्यायालयात सबळ पुराव्यानिशी सिद्ध करता आलेले नाही. (प्रतिनिधी)