व्यावसायिकांचे पदपथांवर अतिक्रमण
By Admin | Updated: September 30, 2015 01:07 IST2015-09-30T01:07:12+5:302015-09-30T01:07:12+5:30
डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, गुरुद्वारा चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर आदी भागांतील पदपथांवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे ज्येष्ठ नागरिक

व्यावसायिकांचे पदपथांवर अतिक्रमण
अतुल क्षीरसागर, रावेत
डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, गुरुद्वारा चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर आदी भागांतील पदपथांवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते.
परिसराचा विकास करीत असताना पालिकेने लाखो रुपये खर्च करून सुसज्ज रस्ते निर्माण केले. रस्त्यालगत पेव्हिंग ब्लॉक टाकून मोठे पदपथ तयार करण्यात आले. सुरुवातीचे काही दिवस याचा वापर नागरिक, विद्यार्थी करत असताना दिसून आले. परंतु, पदपथाच्या बाजूला असणाऱ्या विविध व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायातील विक्रीच्या वस्तू पदपथावर मांडण्यास सुरुवात केली. हळूहळू पूर्णपणे अतिक्रमण करून पदपथ व्यापून टाकला.
बिजलीनगर येथील रेल विहार चौक ते ओम चौकापर्यंत दोन्ही बाजंूनी भंगार, हॉटेल, गॅरेज, भाजीविक्रेते, कापड विक्रेते, विविध हातगाडे आदींनी पदपथावर व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे पदपथ नागरिकांसाठी की व्यावसायिकांसाठी, असा प्रश्न नागरिकांना पडतो. या मार्गावर नेहमीच वाहनांची गर्दी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पदपथाऐवजी रस्त्याने जीव मुठीत घेऊन जावे लागते. गुरुद्वारा परिसरात तर अनेक व्यावसायिक आपला व्यवसाय चक्क रस्त्यावरच मांडतात.
या ठिकाणी नेहमी वाहतूककोंडी होते. डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलासमोर दोन्ही बाजूंनी असणाऱ्या पदपथावर ज्यूस सेंटर, दूध विक्रेते, स्नॅक्स विक्रेते, फळ विक्रेते यांनी पूर्ण पदपथ व्यापला आहे. या ठिकाणी अनेक विद्यार्थी अनेक शाखांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यामुळे परिसरात सतत विद्यार्थी आणि नागरिकांची गर्दी नेहमी असते. व्यावसायिकांनी आपली दुकाने पदपथावर थाटल्यामुळे सर्वांना नाइलाजास्तव रस्त्यानेच जावे लागते. पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे नागरिकांनी अशा व्यावसायिकांबद्दल अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा संबंधित प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेते. त्यामुळे या सर्व व्यावसायिकांचे फावते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी, संबंधित विभागाने अशा व्यावसायिकांच्या विरोधात कडक कारवाई करून नागरिकांच्या वापरासाठी पदपथ मोकळे करावेत, अशी मागणी विद्यार्थी, नागरिक करीत आहेत. वाल्हेकरवाडी शिवाजी चौक, गुरुद्वारा चौक, बिजलीनगर, स्पाइन रोड, अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे.