अतिक्रमण जैसे थे; पोलिसच हटविले
By Admin | Updated: July 15, 2016 00:42 IST2016-07-15T00:42:35+5:302016-07-15T00:42:35+5:30
अतिक्रमणविरोधी विभागाला संरक्षण म्हणून नियुक्त असलेल्या पोलिसांची संख्या महापालिकेने अचानक कमी केली आहे. तब्बल ३० सहायक फौजदारांना परत पाठविण्यात आले आहे.

अतिक्रमण जैसे थे; पोलिसच हटविले
पुणे : अतिक्रमणविरोधी विभागाला संरक्षण म्हणून नियुक्त असलेल्या पोलिसांची संख्या महापालिकेने अचानक कमी केली आहे. तब्बल ३० सहायक फौजदारांना परत पाठविण्यात आले आहे. अतिक्रमण हटविण्याबाबत महापालिका प्रशासन उदासीन आहेच; पण फक्त त्याच कामासाठी म्हणून नियुक्त असलेल्या पोलिसांना आवश्यक सुविधा देण्याबाबतही त्यांनी चालढकल चालविली आहे.
राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे काही वर्षांपूर्वी महापालिकेसाठी म्हणून स्वतंत्र पोलीस बळ देण्यात आले. त्यात एक सहायक पोलीस आयुक्त, ३ पोलीस निरीक्षक, ६ सहायक पोलीस निरीक्षक, ३० सहायक पोलीस फौजदार व उर्वरित पोलीस शिपाई असे तब्बल ८० पेक्षा जास्त मनुष्यबळ देण्यात आले. या सर्वांचे वेतन महापालिका अदा करीत असते. त्यासाठी मासिक काही लाख रुपये खर्च येतो.
पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या गरजेनुसार त्यांना पोलीस बल पुरविण्यात येते. महापालिकेची हद्द विचारात घेता आहे तीच संख्या अपुरी असतानाही तब्बल ३० सहायक फौजदारांना पालिका प्रशासनाने परत पाठविले आहे. त्याचे वेतन देणे परवडत नसल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे.
शिल्लक राहिलेल्या ५० जणांमध्ये सुमारे १० वरिष्ठ अधिकारी आहेत. ते प्रत्यक्ष कारवाईत कधीही भाग घेत नाहीत. उर्वरित ४० पैकी किमान ५ जण कार्यालयीन कामकाजासाठी म्हणून पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये त्यांना दिलेल्या एका दालनात बसलेले असतात. राहिलेल्या ३५ पैकी किमान १० जण साप्ताहिक सुटी, रजा यामुळे उपलब्ध नसतात. फक्त २५ पोलिसांमध्ये अतिक्रमणविरोधी विभागाला संरक्षण कसे देता येईल, याचा विचारच प्रशासनाने केलेला नाही.
क्षेत्रीय कार्यालयांकडून पोलीस संरक्षणाची मागणी झाली की कार्यालयातील पोलिसांकडून मनुष्यबळ नाही असे सांगितले जाते व अतिक्रमणविरोधी विभाग तेच
कारण देत विनाकारवाई बसून राहतात. (प्रतिनिधी)