पुणे: खडकवासला धरण ते फुरसुंगीपर्यंतच्या कालव्याच्या भोवताली बेकायदेशीर बांधकामांचे अतिक्रमण झाले आहे. जलवाहिनीच्या कामासाठी त्यातील काही अतिक्रमणे सुमारे एका वर्षांपूर्वी महापालिकेने काढून टाकली.या भुसभुशीत झालेल्या जमिनीत उंदीर, घुशींनी अनेक छिद्र केल्यामुळे कालव्याच्या मातीचा पाया खचला आणि त्यामुळे दांडेकर पूल भागातील कालवा फुटण्याची घटना घडली, असा तर्क जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी लावला आहे. खडकवासला धारणामधून मुठा उजवा कालव्यातून इंदापूरला पाणी पुरवठा केला जातो.खडकवासला ते इंदापूरपर्यंतच्या कालव्याचे अंतर सुमारे २०२ कि.मी आहे. त्यातील २८ कि. मी.चा कालवा शहरातून जातो. गेल्या काही वर्षांत जलसंपदा विभागाच्या जागेवरील अतिक्रमणांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात पर्वती,जनता वसाहत, हडपसर औद्योगिक वसाहत, मगरपट्टा, साडेसतरा नळी या परिसरातील कालव्या जवळच्या परिसरात मोठी अतिक्रमणे झाल्याचे निदर्शनास आले. त्यावर जलसंपदा विभागाने महापालिकेला संबंधित अतिक्रमणे काढून टाकण्याबाबत पत्रव्यवहार केला.परिणामी गेल्या वर्षी जलवाहिनी टाकण्यासाठी महापालिकेने काही झोपड्या हटवल्या. त्यानंतर उंदीर, घुशींनी या भागातील जमीन भुसभुशीत केली.परिणामी कालव्यातील पाण्याला वेगळी वाट मिळली.त्यातून ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता जलसंपदा विभागाचे राज्याचे मुख्य अभियंता टी.एन. मुंडे यांनी व्यक्त केली.खडकवासला धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले आहे,असे नमूद करून मुंडे म्हणाले, इंदापूरपर्यंतच्या ग्रामीण भागासह शहरातील जलशुध्दीकरण केंद्रांनाही कालव्यातून पाणी पुरवठा केला जातो.त्यामुळे वर्षभर हा कालवा सुरूच ठेवावा लागतो.परिणामी कालव्याची दुरूस्ती करता येत नाही.सुमारे दीड महिन्यापासून खडकवासला धरणातून इंदापूरला पाणी सोडण्यात आले आहे. सध्या कालव्यातून शेतीसाठी बाराशे ते चौदाशे क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. शहरातून जाणाऱ्या कालव्याचा पाया दांडेकर पूलाजवळ खचला असून त्यामुळे पंचवीस लक्ष घन फुट पाणी वाहून गेले.
उंदीर आणि घुशींनी फोडला कालवा : जलसंपदा विभागाचा तर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 20:47 IST
भुसभुशीत झालेल्या जमिनीत उंदीर, घुशींनी अनेक छिद्र केल्यामुळे कालव्याच्या मातीचा पाया खचला आणि त्यामुळे दांडेकर पूल भागातील कालवा फुटण्याची घटना घडली..
उंदीर आणि घुशींनी फोडला कालवा : जलसंपदा विभागाचा तर्क
ठळक मुद्देखडकवासला ते इंदापूरपर्यंतच्या कालव्याचे अंतर सुमारे २०२ कि.मीधरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी बंद जलसंपदा विभागाने महापालिकेला संबंधित अतिक्रमणे काढून टाकण्याबाबत पत्रव्यवहार