राम नदीला अतिक्रमणाचा विळखा
By Admin | Updated: May 23, 2015 00:37 IST2015-05-23T00:37:47+5:302015-05-23T00:37:47+5:30
राम नदीच्या पात्रात येथील बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात राडारोडा व भराव टाकला आहे, तसेच काही ठिकाणी वॉल कंपाऊंड टाकून नदीचा नैसर्गिक प्रवाह अडविण्यात आला आहे.

राम नदीला अतिक्रमणाचा विळखा
पुणे : राम नदीच्या पात्रात येथील बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात राडारोडा व भराव टाकला आहे, तसेच काही ठिकाणी वॉल कंपाऊंड टाकून नदीचा नैसर्गिक प्रवाह अडविण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात बावधन परिसराला पुन्हा पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, असा अहवाल मुळशी तहसीलदार व पाटबंधारे विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. या अहवालाची गंभीर दखल घेऊन ही अतिक्रमणे त्वरित काढून टाकण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जागेच्या वाढत्या भावामुळे पुणे शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात टेकड्या, ओढे-नाले आणि नद्यांवरदेखील अतिक्रमणे झाली आहेत. पुणे शहराच्या पश्चिमेला असलेल्या राम नदीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. स्थानिक राजकर्त्यांच्या आशीर्वादाने राम नदीवर अनेक लहान-मोठ्या बिल्डरांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे राम नदीचे अस्तित्व नाहीसे झाले असून, केवळ कागदोपत्री येथे नदी असल्याचे दिसत आहे. नदीच्या दोन्ही तीरावर बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या भिंती आणि मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेल्या राडारोड्यामुळे नदीचे ओढ्यात रूपांतर झाले आहे.
1राम नदीच्या पात्रामध्ये अतिक्रमण करून राडारोडा टाकल्यामुळे २०१० मध्ये झालेल्या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे येथील रानवारा सोसायटीसह अन्य काही सोसायट्यांमध्ये ६ ते ७ फुटांपर्यंत पाणी शिरले होते. या पार्श्वभूमीवर मुळशी तहसीलदार, उपअधीक्षक भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी, पाटबंधारे विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दहा दिवसांपूर्वी राम नदीपात्रात झालेल्या अतिक्रमणांची प्रत्यक्ष पाहणी केली.
2यात अनेक मोठ्या व नामांकित बिल्डरांसह हॉटेल व्यावसायिकांनी राम नदी पात्रात अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले. यात प्रामुख्याने एका डेव्हलपर्सने नदीच्या पात्रातच डबर आणि मातीचा भराव टाकल्याचे निदर्शनास आले. याशिवाय काही व्यावसायिकांनी नदीपात्रातच संरक्षक भिंत बांधल्याचे निदर्शनास आले. ही अतिक्रमणे न हटविल्यास येणाऱ्या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन निवासी प्रकल्पामध्ये पाणी शिरण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा अहवाल दिला आहे.
3या अहवालाची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा २००५ नुसार अतिक्रमण केलेल्या सर्व लोकांना नोटिसा दिल्या असून, अतिक्रमणे त्वरित काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी येत्या पंधरा दिवसांत अतिक्रमण न काढल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.