बँकांच्या खासगीकरणाविरोधात कर्मचारी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:12 IST2021-03-15T04:12:27+5:302021-03-15T04:12:27+5:30

पुणे : आयडीबीआय आणि दोन खाजगी बँकांच्या खाजगीकरणाची केंद्र शासनाने घोषणा केली आहे. या निर्णयाविरुद्ध देशभरातील बँक कर्मचारी दोन ...

Employees on strike against privatization of banks | बँकांच्या खासगीकरणाविरोधात कर्मचारी संपावर

बँकांच्या खासगीकरणाविरोधात कर्मचारी संपावर

पुणे : आयडीबीआय आणि दोन खाजगी बँकांच्या खाजगीकरणाची केंद्र शासनाने घोषणा केली आहे. या निर्णयाविरुद्ध देशभरातील बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. या संपात महाराष्ट्र राज्यातील दहा हजार पेक्षा जास्त शाखेतून काम करणारे अंदाजे पन्नास हजार बँक कर्मचारी तसेच अधिकारी सहभागी होणार आहेत. सोमवार-मंगळवार बँका बंद राहणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे.

यामध्ये १२ सार्वजनिक क्षेत्रातील, १२ जुन्या जमान्यातील खाजगी, सहा विदेशी, ५६ प्रादेशिक ग्रामीण बँकेतील दहा लाखांवर बँक कर्मचारी सहभागी होणार आहेत. या बँका १५० लाख कोटी रुपयांचा म्हणजे एकूण बँकिंग व्यवसायाच्या ७० टक्के व्यवसाय हाताळतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निदर्शने, धरणे, मेळावे घेणे शक्य नसल्याने ग्राहकांना घरोघर तसेच व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन भेटून संपाची माहिती देणार आहेत. तसेच, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, कॉर्पोरेटर, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचीही भेट घेत आहेत.

हा संप १०० टक्के यशस्वी होईल असा विश्वास युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे महाराष्ट्र राज्य निमंत्रक देवीदास तुळजापूरकर यांनी व्यक्त केला आहे. या संपात ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉनफेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, इंडियन नॅशनल बँक एम्पलॉइज फेदरेशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स आणि बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटना सहभागी झाल्या आहेत.

Web Title: Employees on strike against privatization of banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.