पालिकेचे पाळणाघर कर्मचाऱ्यांना झाले नकोसे

By Admin | Updated: March 23, 2016 01:31 IST2016-03-23T01:31:25+5:302016-03-23T01:31:25+5:30

महापालिकेच्या समाजविकास विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या पाळणाघराला पालिकेतील कर्मचाऱ्यांचा योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

The employees of the corporation did not have to | पालिकेचे पाळणाघर कर्मचाऱ्यांना झाले नकोसे

पालिकेचे पाळणाघर कर्मचाऱ्यांना झाले नकोसे

पुणे : महापालिकेच्या समाजविकास विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या पाळणाघराला पालिकेतील कर्मचाऱ्यांचा योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. पुणे महापालिकेच्या वतीने सुमारे २० वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघर चालविण्यात येते. शहराच्या मध्यवस्तीत गावठाण भागात असणाऱ्या या पाळणाघराचा उपयोग मात्र पालिका कर्मचारी का करीत नाहीत, याची लोकमत प्रतिनिधीने पाहणी केली असता हे चित्र समोर आले. अतिशय स्वच्छ आणि उत्तम सुविधा तसेच अतिशय किमान शुल्क आकारले जात असताना कर्मचारी आपल्या मुलांना या ठिकाणी का ठेवत नाहीत, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
४० मुलांची क्षमता असणाऱ्या या पाळणाघरात सध्या केवळ १४ जणांचा पट आहे. त्यातीलही केवळ तीनच जण पालिका कर्मचाऱ्यांची मुले आहेत. पालिकेतून येणारा प्रतिसाद लक्षात घेता, या ठिकाणी बाहेरील मुलांनाही प्रवेश देण्यात येत असल्याचे या पाहणीतून समोर आले. सध्याही उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने किंवा काही जण आजारी असल्याने केवळ ४ जणच या ठिकाणी उपस्थित असल्याचे दिसले. पाळणाघरात महापालिकेच्या जवळच पालिकेची कै. लालबहाद्दूर शास्त्री माध्यमिक शाळा आहे. या शाळेच्या आवारातच पाळणाघराची अतिशय उत्तम सोय करण्यात आलेली आहे. या ठिकाणी एक मोठा हॉल, खेळणी आणि पाळण्यांची एक खोली, स्वयंपाकघर व आजूबाजूला मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागा, असे उत्तम आवार असताना या पाळणाघराकडे पालिकेतील कर्मचारी का पाठ फिरवतात, हा खरा प्रश्न आहे.
याचबरोबर, मुलांना ८ तास या पाळणाघरात ठेवण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून महिन्याला केवळ १०० रुपये इतका कमी दर आकारला जातो. त्यामुळे खासगी पाळणाघरांमध्ये आपल्या पाल्यासाठी हजारो रुपये देणारे पालक पालिकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या या पाळणाघराला का पसंती देत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होतो. अतिशय स्वच्छ असलेल्या या पाळणाघरात महापालिकेच्या दोन सिस्टर दोन पाळ्यांमध्ये काम करतात. याचबरोबर ४ महिला कर्मचारी येथे मुलांकडे लक्ष देणे आणि जागेची स्वच्छता करणे अशी कामे दोन पाळ्यांमध्ये करतात. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांवर आणि इतर सुविधांवर महापालिका खर्च करीत असतानाही पालिकेतील कर्मचारी त्याचा फायदा घेत नसल्याचे लक्षात येते.
तसेच, या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी फारशा विशेष अटी नाहीत. वर्षभरात कोणत्याही महिन्यात काही ठराविक कागदपत्रे जमा करून येथील प्रवेश घेता येऊ शकतो. सहा महिन्यांपासून ते ५ वर्षांपर्यंतची मुलांना येथे प्रवेश दिला जातो. आपल्या पाल्याला संभाळण्यासाठी इतकी चांगली सोय महापालिका देते.

Web Title: The employees of the corporation did not have to

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.