अधिसभेच्या बैठकीत विद्यार्थी हिताच्या प्रश्नांवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:32 IST2021-01-08T04:32:58+5:302021-01-08T04:32:58+5:30
पुणे विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक येत्या ९ व १० जानेवारी रोजी आयोजित केली जाणार आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबरोबरच कोरोनामुळे निर्माण ...

अधिसभेच्या बैठकीत विद्यार्थी हिताच्या प्रश्नांवर भर
पुणे विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक येत्या ९ व १० जानेवारी रोजी आयोजित केली जाणार आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबरोबरच कोरोनामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर मार्ग काढण्याच्या दृष्टीने चर्चा केली जाणार आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासह अनेक प्रश्नांबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी साह्यता व मार्गदर्शन केंद्र सुरू करावे. विद्यार्थी कोरोनामुळे सुमारे आठ-नऊ महिन्यांपासून घरी आहेत. विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे पहिले सत्र संपत आले आहे. मात्र, एकूण परिस्थितीचा आढावा घेऊनच परीक्षा जाहीर कराव्यात, अशी मागणी अधिसभा सदस्यांकडून केली जाणार आहे.
विद्यापीठात व संलग्न महाविद्यालयात पीएच.डी अंतर्गत संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे विद्यापीठाने पीएच.डीच्या नियमावलीत सुधारणा करावी. तसेच विद्यार्थ्यांकडून एक समाजशुल्क आकारले जाईल अशी व्यवस्था करावी, हा मुद्दा चर्चेसाठी मांडला जाणार आहे.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांकडून विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जाते. मात्र, या परीक्षांचे शुल्क अवाच्या सवा असते. त्यामुळे विद्यापीठाने या परीक्षांवर निर्बंध घालावेत. कोरोनानंतर विद्यार्थ्यांना आरोग्यदायी वातावरणात शिक्षण घेता येईल, याबाबत खबरदारी बाळगावी, अशी मागणी अधिसभा सदस्यांकडून केली जाणार आहे.