शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना आंबाविक्री!

By Admin | Updated: March 27, 2015 00:26 IST2015-03-27T00:26:54+5:302015-03-27T00:26:54+5:30

मार्केट यार्डामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही थेट शेतकऱ्यांकडून हापूस आंबाविक्री गुरुवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी ग्राहकांचा सामान्य प्रतिसाद मिळाला.

Emanata directly from farmers to consumers! | शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना आंबाविक्री!

शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना आंबाविक्री!

पुणे : मार्केट यार्डामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही थेट शेतकऱ्यांकडून हापूस आंबाविक्री गुरुवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी ग्राहकांचा सामान्य प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र राज्य कृषी, पणन महामंडळाच्या कार्यालयाजवळ डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंध संस्थानच्या जागेत ही विक्री सुरू आहे. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने होणाऱ्या या ‘थेट शेतकरी ते ग्राहक’ आंबा महोत्सवाचे उद्घाटन संस्थानचे संचालक नवलकिशोर तिवारी यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थानच्या वसतिगृहाचे व्यवस्थापक संदीप वाघ उपस्थित होते.
‘‘आम्ही शेतकरी कोणत्याही प्रकारची भेसळ न करता नैसर्गिक पद्धतीने आंबा पिकवतो. २० स्टॉल मिळून पहिल्या दिवशी ५ डझनाच्या सुमारे ४०० पेट्यांची आवक झाली. यापैकी ८०० ते ९०० डझन आंबा विकला गेला. सध्या एका डझनाला ७०० ते १२०० रुपये भाव आहे. बाजारापेक्षा हा दर जास्त असला तरी उत्तम प्रतीचा आणि नैसर्गिकरीत्या पिकवलेला आंबा मिळत असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभेल, अशी आशा आहे. येत्या काळात आवक वाढल्यानंतर दर कमी होतील,’’ असे शैलेश पुजारी आणि नारायण तिर्लोस्कर यांनी सांगितले.
दोन ते अडीच महिने हा महोत्सव चालेल. आधी ही विक्री पणन महामंडळाच्या जागेत व्हायची. मात्र, तिथे सौंदर्यीकरण केल्यावर ही विक्री बंद झाली. याबाबत माहिती देताना देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे विजय करंदीकर म्हणाले, ‘‘आंबा महोत्सवाचे हे १४ वे वर्र्ष आहे. पहिली १२ वर्षे महामंडळाच्या वतीने त्यांच्या जागेत हा महोत्सव चालायचा. सौंदर्यीकरणानंतर महामंडळाने आम्हाला दिलेली पर्यायी जागा व्यवसायाच्या दृष्टीने योग्य नसल्याने तुलनेत जास्त भाडे असलेल्या या जागेत मागील वर्षीपासून आम्ही हा महोत्सव घेतो.’’ (प्रतिनिधी)

रामनवमीला पाच रुपये किलोने बटाटाविक्री
पुणे : रामनवमीनिमित्त येत्या शनिवारी (दि. २८) नऱ्हे-आंबेगाव रोडवर नवले लॉन्सशेजारी असलेल्या साईकृपा भाजी सेंटरच्या वतीने ५ रुपये किलोने बटाटाविक्री करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते असलेले सेंटरचे प्रमुख दादासाहेब लाटे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.’’ सकाळी १० ते रात्री १० या वेळेत ७ टन बटाट्याची विक्री करण्यात येणार आहे. ही विक्री केवळ सामान्य ग्राहकांसाठीच असल्याचे लाटे यांनी नमूद केले.

Web Title: Emanata directly from farmers to consumers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.