हेल्मेटसक्तीविरोधात एल्गार

By Admin | Updated: February 6, 2016 01:51 IST2016-02-06T01:51:19+5:302016-02-06T01:51:19+5:30

शहरातील गर्दीमध्ये वेगाने दुचाकी चालविता येत नाहीत, त्यामुळे पुणेकरांवर हेल्मेटसक्ती लादू नये. प्रबोधनातून हेल्मेट वापरण्याचे आवाहन करावे, मात्र सक्ती करू नये,

Elgar against helmets | हेल्मेटसक्तीविरोधात एल्गार

हेल्मेटसक्तीविरोधात एल्गार

पुणे : शहरातील गर्दीमध्ये वेगाने दुचाकी चालविता येत नाहीत, त्यामुळे पुणेकरांवर हेल्मेटसक्ती लादू नये. प्रबोधनातून हेल्मेट वापरण्याचे आवाहन करावे, मात्र सक्ती करू नये, अशी भूमिका घेत हेल्मेटसक्तीविरोधात शनिवारपासून सर्वपक्षीय आंदोलन छेडण्याचा निर्णय हेल्मेटसक्तीविरोधी कृती समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
हेल्मेटसक्तीविरोधात मंडई येथील टिळक पुतळ््याजवळ शनिवारी सकाळी १०.३० वाजता सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येणार आहे. हेल्मेटसक्तीविरोधी कृती समितीच्या बैठकीला माजी महापौर अंकुश काकडे, भाजपाचे पदाधिकारी संदीप खर्डेकर, शांतिलाल सुरतवाला, बाळासाहेब रुणवाल, भोला वांजळे, धीरज घाटे, श्रीकांत शिळीमकर उपस्थित होते. शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण, भाजपाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
पुणे शहरातील रस्त्यांची स्थिती, ड्रेनेजच्या झाकणांची दुरवस्था, अरुंद रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी या पार्श्वभूमीवर दुचाकी चालविण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. या कारणांमुळे रस्त्यावरील दुचाकी चालविताना वाहनाचा वेग खूपच कमी राहतो. या पार्श्वभूमीवर शहरामध्ये हेल्मेटसक्ती करण्यात येऊ नये, त्याऐवजी हेल्मेट घालण्याबाबत प्रबोधन करावे, अशी भूमिका या बैठकीमध्ये मांडण्यात आली.
हेल्मेटसक्ती ही एका रात्रीतून राबविली जाणे चुकीचे आहे. सर्व दुचाकीचालकांसाठी हेल्मेटची उपलब्धता सध्या बाजारात नाही. त्यामुळे हेल्मेटसक्ती पूर्वसूचना न देता राबविणे चुकीचे आहे, अशी मते या वेळी मांडण्यात आली. सक्तीमुळे हेल्मेट कंपन्या मालामाल होतील, अशी टीकाही या वेळी करण्यात आली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने नाइलाजास्तव दुचाकी वापरणाऱ्या पुणेकरांवर हेल्मेटसक्ती अन्यायकारक ठरणार असल्याने याविरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. मेधा कुलकर्णी यांनीही हेल्मेटसक्तीच्या निर्णयाला विरोध दर्शविला. त्यांनी सांगितले, ‘प्रत्येक शहराची परिस्थिती वेगळी असते, पुणे शहरामध्ये हेल्मेटसक्ती लागू करणे योग्य होणार नाही.’
> हेल्मेट कारवाईचा आलेख चढताच
पुणे : वाहतूक पोलिसांनी जोमाने सुरू केलेली हेल्मेट कारवाई शुक्रवारी दिवसभर सुरूच होती. वाहतूक पोलिसांच्या या कारवाईचा आलेख शुक्रवारीही चढताच राहिला. दिवसभरात वाहतूक पोलिसांनी ५ हजार ५४४ वाहनचालकांवर कारवाई करीत तब्बल ५ लाख ५८ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती उपायुुक्त सारंग आवाड यांनी दिली. शुक्रवारचा आकडा गुरुवारच्या तुलनेत ८२७ ने वाढला आहे, तर दंडाची रक्कम ८१ हजार १०० रुपयांनी वाढली आहे. काही वाहनचालकांसोबत पोलिसांचा वादही दिवसभर सुरूहोता.

Web Title: Elgar against helmets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.